बारामती,
Ajit Pawar, बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे टोला लगावला. काहीजण निवडणुका जवळ आल्यावर अचानक सक्रिय होतात, असे ते म्हणाले आणि विचारले की, संविधानाने निवडणूक लढविण्याचा अधिकार दिला असला तरी पाच वर्षे हे लोक कुठे होते आणि त्यांनी सामान्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या का?
सभेत पवार म्हणाले, शहरात अपघात टाळण्यासाठी काही ठिकाणी दुभाजक उभारले तरी त्यावर नाराजी व्यक्त केली जाते. १९६७ साली बारामतीत अवघे १७ हजार मतदार होते, तर आज ही संख्या सातपट वाढली आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि इतर विकासकामे करणे आवश्यक आहे. ही कामे केली तरी टीका होते आणि केली नाहीत तरी टीका होते, असे त्यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले, “काम करताना काही त्रुटी राहू शकतात; आपण सर्वगुणसंपन्न असल्याचा दावा करत नाही. मात्र बारामतीकरांसाठी जे प्रामाणिकपणे आणि बारकाईने काम केले आहे, ते कोणीही करून दाखवू शकणार नाही.” काहीजण भावनिक मुद्दे काढतात, तरी मी प्रत्येक धर्माचा आदर करणारा असून शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेतूनच कार्यरत आहे, असे त्यांनी सांगितले.
पवार यांनी Ajit Pawar, बारामतीतील जातीय सलोखा कायम ठेवण्याचे आवाहनही केले. त्यांनी म्हटले, “निवडणुका आल्या की आरोप-प्रत्यारोप होतात. मला टीकेपेक्षा कामातून उत्तर देण्यावर अधिक विश्वास आहे. टीका करणाऱ्यांना टीका करू द्या, आपण त्यांना कामातूनच उत्तर देऊ.”विकासकामांवर बोलताना त्यांनी अधोरेखित केले की, “केवळ भाषणांनी किंवा गोड बोलण्याने विकास होत नाही. विकासासाठी सर्वांची साथ आणि समन्वय आवश्यक असतो.” शरद पवार गटाचे नाव न घेता त्यांनी सांगितले की, काही लोक येऊन आश्वासनांची खैरात करतील; मात्र बारामतीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण जनतेसमोर उभे आहोत आणि हे काम करण्याची क्षमता इतर कोणाकडे नाही.