नागपूर,
ayushi-singh : भारतीय आहारपद्धतीत पूर्वी महत्त्वाचे स्थान असलेल्या पारंपरिक मिलेटचे (भरडधान्यांचे) भवितव्य उज्ज्वल असून, बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेल्या आरोग्य समस्यांमुळे समाज पुन्हा एकदा पौष्टिक व नैसर्गिक खाद्यांकडे वळत आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आदिवासी आयुक्त आयएएस आयुषी सिंग यांनी केले. सेंटर ऑफ एक्सलन्स (स्वाहा), विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी) नागपूर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वूमन, चाईल्ड अँड यूथ डेव्हलपमेंट आणि डीआरआय केव्हीके अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय कार्यशाळा व मिलेट एक्स्पो ‘स्वानुभूती २०२५’ चा शुभारंभ शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी व्हीएनआयटीच्या रासायनिक अभियांत्रिकी विभागात झाला.

यावेळी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या कापूस विकास संचालनालयाचे संचालक डॉ. ए. एल. वाघमारे, दिनदयाल शोध संस्थेचे डॉ. उपेंद्र कुळकर्णी, एनआयडब्ल्यूसीवायडी नागपूरचे सहसंस्थापक राजेश मालवीय तसेच आयोजन समितीचे प्रमुख डॉ. सचिन मांडवगणे उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी आयुषी सिंग यांनी बालपणापासूनच आहारात मिलेटचा समावेश केल्यास लठ्ठपणा, मधुमेह यांसारख्या जीवनशैलीजन्य आजारांपासून दूर राहता येते, असे सांगत मिलेटबाबत व्यापक जनजागृतीची आवश्यकता अधोरेखित केली. डॉ. ए. एल. वाघमारे यांनी मिलेटविषयक केंद्र शासनाच्या धोरणांची व विविध योजनांची माहिती दिली. राजेश मालवीय यांनी मिलेटपासून चविष्ट व आरोग्यदायी पदार्थ विकसित करण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. प्रास्ताविकात डॉ. सचिन मांडवगणे यांनी व्हीएनआयटीमध्ये सुरू असलेल्या मिलेट संशोधनासह ‘स्वाहा’च्या कार्याची माहिती दिली. उद्घाटनानंतर दिवसभर मिलेटशी संबंधित विविध विषयांवर तज्ज्ञांची मार्गदर्शक सत्रे पार पडली. सायंकाळी महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील आदिवासी भागांतून आलेल्या पारंपरिक मिलेट-आधारित खाद्यपदार्थ व विविध उत्पादनांचे आकर्षक प्रदर्शन भरविण्यात आले. आरोग्य, पर्यावरण आणि आदिवासी ज्ञानपरंपरेचा संगम घडवणारा हा उपक्रम नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.