वेध...
Do not give vehicles to minors : मोटार वाहन कायद्यात दुचाकी आणि चारचाकी चालविण्याचे वय ठरविण्यात आले आहे. मग तरीही अनेक आई-वडील प्रेमापोटी मुलांच्या हाती वाहन देत संकट ओढवून घेतात. अनेकदा मुलेच पालकांची नजर चुकवून वाहन नेतात. पण पुढे काय होणार, याचे त्यांना भान नसते. नागपुरात असाच प्रकार घडला आणि मुलाने केलेल्या कृतीचा भुर्दंड वडिलांना बसला. मुलाने वाहन कायद्याचा भंग केल्याबद्दल पित्याला 30 हजार रुपयांचा दंड भरावा लागला. ही घटना सोनेगाव पोलिस स्टेशनअंतर्गत 26 नोव्हेंबर 2025 रोजी घडली. यातील पिता पोलिसी कारवाईच्या विरोधात न्यायालयात गेला. पण न्यायाधीशांनी पोलिसांची बाजू योग्य असल्याचा निर्वाळा देत पित्याला दंड भरण्याचा आदेश दिला. अखेर हतबल पित्याने पश्चात्ताप व्यक्त करीत 30 हजारांनी खिसा रिकामा करवून घेतला.

दंड भरताना वडिलांना मुलाचा राग आला असेल, पण ‘मरता क्या नही करता’ याप्रमाणे त्या पित्याला पैसे भरावे लागले. अशी वेळ इतर पित्यांवर येऊ नये म्हणून आजच सावध व्हा आणि लहान मुलांच्या हाती चारचाकी, दुचाकी वाहने देऊ नका. त्यांना कायद्यात राहण्याचे फायदे समजावून सांगा. प्रत्येक ठिकाणी कायदा मोडण्याची गरज नसते. आई-वडिलांनी कायदा मोडून मुलांना आपल्याच लोकांविरोधात क्रांतिकारी बनवायची गरज नाही. तो चांगला संस्कारी नागरिक झाला तरी आपले जीवन सार्थकी लागले, याचे समाधान आई-वडिलांनी मानायला हवे. बहुतांश कुटुंबांत वडील कामानिमित्त नेहमीच बाहेर असतात. यामुळे घरात मातृशक्तीचा जागर असतो. समजा मातृशक्तीने आपल्या मुला-मुलींना दररोज घरातून बाहेर पडताना मोटार वाहन कायद्याची माहिती दिली तर नक्कीच आपण अपघातमुक्त शहर तयार करू शकतो.
एवढेच नव्हे तर अल्पवयीन मुलेही वाहन नेण्यापूर्वी दहा वेळा विचार करतील. परिणामी कटु प्रसंग संबंधित कुटुंबांवर ओढवणार नाहीत. असाच लोकहितवादी प्रयोग रोडमार्क फाऊंडेशनचे अध्यक्ष राजू वाघ यांनी नागपुरात ‘मातृशक्तीचा जागर अपघातमुक्त भारताची वाटचाल’ हा उपक्रम सुरू करून केला आहे. ते म्हणतात, जेव्हा आई-वडील मुलांना संस्कार देतात, तेव्हाच त्यांनी वाहन नेमके कुठल्या वयात हाती घ्यायला हवे, हेदेखील समजावून सांगायला हवे. प्रत्येक घरात आईचे महत्त्व आहे. आईचा शब्द शेवटचा मानला जातो. समजा त्या मातृशक्तीने पुढाकार घेत लहान मुलांच्या हाती वाहन द्यायचे नाही, असा नियम अमलात आणल्यास कुठल्याही वडिलांवर दंड भरण्याची नामुष्की ओढवणार नाही. वस्तुत: लहान मुलांनी अर्जुनाप्रमाणे आपल्या ध्येयावर लक्ष द्यायला हवे. जेव्हा मुले समाजहितकारक कार्य करण्याची मनीषा ठेवतील, तेव्हाच त्यांच्या जीवनात प्रगतीचा चमत्कार घडेल.
‘मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर। किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर।। मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा। जशा वाèयानं चालल्या, पानावरच्या लाटा।।’ ही बहिणाबाई चौधरी यांची कविता मनाचा ठाव घेणारी आहे. लहान मुलांचे मन असेच असते. त्यांच्या हाती वाहन आल्यावर त्यांच्या कानात वारा घुसतो अन् ते बेभान होतात. आपण वायुवेगाने गेल्याने एखाद्या निष्पाप व्यक्तीचा प्राण जाईल, तो कायमस्वरूपी जायबंदी होईल याची त्यांना भीती वाटत नाही. ते थरार म्हणून वाहन वेगाने चालवितात. नंतर जे नको घडायचे ते घडते अन् सारा मामला पोलिस ठाण्यापर्यंत येऊन पोहोचतो. तिथे दोषीचे कुटुंबीय गयावया करतात. पण वेगाने वाहन चालविणे म्हणजे चंद्रावर जाण्यासारखे नाही.
मात्र वयाप्रमाणे मुला-मुलींच्या मनात वेगळा थरार करण्याचा बेत असतो. परंतु मी म्हणतो, मुला-मुलींना थरारच करायचा असेल तर तो अभ्यासात करावा. आसपास राहणाèया लोकांना मदत करून केल्यास उत्तमच होईल. जेव्हा तुमची मुले अशी कृती करतील, तेव्हा तुम्हाला त्यांचा अभिमान वाटेल. पित्याची 56 इंची छाती अभिमानाने फुगेल आणि मी या मुलाचे वडील, असे ते जगाला निक्षून सांगतील. तो दिवस आपल्याही आयुष्यात यावा असे ज्यांना वाटते, त्यांनी आजपासून लहान मुलांच्या हाती वाहन देणार नाही, असा संकल्प सोडून तशी कृती करावी. अन्यथा, केशाने केले नाèयाला ताप यासाठी तयार राहा.
- अनिल उमाकांत फेकरीकर
9881717859