खडी भरलेला डंपर कारवर उलटल्याने चार ठार

19 Dec 2025 09:46:28
बुंदी,
dumper truck overturned onto a car राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यात भीषण अपघात घडला असून त्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जयपूर–कोटा राष्ट्रीय महामार्गावर सिलोर कल्व्हर्टजवळ खडीने भरलेला डंपर अचानक एका कारवर उलटल्याने ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी कोट्याकडे निघालेले तीन भाऊ आणि त्यांचा एक पुतण्या यांचा समावेश आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टोंक जिल्ह्यातील रहिवासी असलेले पाच जण क्रेटा कारमधून आपल्या नातेवाइकाच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी कोटा येथे जात होते. सायंकाळी सुमारे साडेपाचच्या सुमारास सिलोर कल्व्हर्टजवळ त्यांच्या कारजवळून वेगाने जाणाऱ्या डंपरचा पुढचा टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि खडीने भरलेला डंपर थेट कारवर पलटी झाला. काही क्षणांतच कार डंपर आणि खडीखाली पूर्णपणे दबली गेली.
 
 
dumper truck overturned
 
अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीला धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. क्रेन आणि जेसीबीच्या सहाय्याने डंपर व खडी हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. जवळपास एक तास चाललेल्या प्रयत्नांनंतर कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत चार जणांचा मृत्यू झाला होता. अपघातात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. या दुर्घटनेत फरीउद्दीन (४५), अजिरउद्दीन (४०), मोइनुद्दीन (६२) आणि सफेउद्दीन (२८) यांचा जागीच मृत्यू झाला. हे चौघेही एकाच कुटुंबातील असून त्यात तीन भाऊ आणि एका पुतण्याचा समावेश आहे. कुटुंबातील सर्वात मोठे बंधू बसीउद्दीन (६४) गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथम बुंदी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी कोटा येथे हलवण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0