हादीच्या मारेकऱ्यांना भारतातून आणा, नाहीतर…युनूस सरकारला उघड इशारा

19 Dec 2025 18:25:59

ढाका,  

inquilab-manch-warning-to-yunus बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर देशासमोर आता गंभीर संकट उभे राहिले आहे. जुलै उठावातील प्रमुख नेता आणि ‘इंकलाब मंच’चा संयोजक शरीफ उस्मान हादीचा सिंगापूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. राजधानी ढाक्यासह विविध भागांत निदर्शने, जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत.
 
 
inquilab-manch-warning-to-yunus

हादीवर गोळीबार करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करण्यात आली नाही, तर संपूर्ण देश ठप्प केला जाईल, असा इशारा इंकलाब मंचने दिला आहे. संघटनेने शाहबाग चौकात अनिश्चितकालीन आंदोलन छेडण्याची तसेच देशव्यापी आंदोलन उभारण्याची घोषणा केली आहे. गुरुवारी फेसबुकवर जारी केलेल्या निवेदनात, हादी जर आपल्या जखमांमुळे मृत्युमुखी पडले, तर हा लढा देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी असेल, असे मंचने स्पष्ट केले होते. आंदोलक आरोपींना न्याय मिळेपर्यंत शाहबाग सोडणार नाहीत, असेही जाहीर करण्यात आले. संघटनेने सरकारला थेट इशारा देत सांगितले आहे की मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर संपूर्ण बांग्लादेश ठप्प केला जाऊ शकतो. कायदा-सुव्यवस्था आणि न्याय प्रस्थापित करण्याची जबाबदारी पूर्णपणे सरकारचीच असेल, असेही निवेदनात नमूद आहे. तसेच, हल्लेखोर भारतात पळून गेले असतील, तर बांग्लादेश सरकारने भारतीय अधिकाऱ्यांशी कोणत्याही किंमतीत चर्चा करून त्यांना परत आणावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. inquilab-manch-warning-to-yunus हा प्रश्न केवळ एका नेत्यावरील हल्ल्याचा नसून, देशाच्या सुरक्षिततेचा आणि सार्वभौमत्वाचा असल्याचा दावा इंकलाब मंचने केला आहे.

या निवेदनानंतर काही तासांतच सिंगापूरहून हादीच्या मृत्यूची बातमी आली. त्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली. ढाक्यामध्ये जमाव आक्रमक झाला असून, किमान दोन वृत्तपत्रांच्या कार्यालयांना आग लावण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. १२ डिसेंबर रोजी ढाक्यातील पल्टन परिसरात दिवसाढवळ्या दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी शरीफ उस्मान हादी यांच्यावर गोळीबार केला होता. ते रिक्षातून प्रवास करत असताना, जुम्म्याची नमाज अदा करून परतत होते. inquilab-manch-warning-to-yunus गोळी थेट डोक्यात लागल्याने त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली. सुरुवातीला ढाक्यातील एव्हरकेअर रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना सिंगापूरला हलवण्यात आले. सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर १८ डिसेंबरच्या रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इंकलाब मंचने फेसबुक पोस्टद्वारे त्यांच्या मृत्यूची पुष्टी करत त्यांना ‘शहीद’ घोषित केले.

दरम्यान, अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनीही हादी यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करत एक दिवसाचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. शरीफ उस्मान हादी हे जुलै २०२४ मधील विद्यार्थी-नेतृत्वाखालील उठावाचे प्रमुख चेहरे होते. या उठावामुळे तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार सत्तेवरून पायउतार झाले होते. आगामी संसदीय निवडणुकीत ते ढाका-८ मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याच्या तयारीत होते. भारतविरोधी आणि शेख हसीना विरोधी भूमिकांसाठी ते विशेष ओळखले जात होते.

Powered By Sangraha 9.0