असे ‘माणिक’ नकोच!

19 Dec 2025 06:00:00
अग्रलेख

manikrao-kokate :
संस्कार, चारित्र्य, प्रतिमा, प्रतिष्ठा आदी शब्दांना आपल्या आचारासोबत जोडणे तर दूरच; असे विचारदेखील ज्यांच्या मनात येत नसावेत, असे काही नेते लोकप्रतिनिधी म्हणून विधिमंडळात दाखल होतात, हे लोकशाहीचे दुर्दैवच म्हटले पाहिजे. असे लोक आपल्या दुराचारातून आपल्या संस्कारहीनतेचे दर्शन घडवितात आणि आपल्या प्रतिमेचा व प्रतिष्ठेचा आपल्या व्यवहारांशी काहीही संबंध नसावा इतक्या बेफिकिरीने स्वतःचेच वाभाडे काढून घेत स्वहस्ते प्रतिमाभंजन करून घेतात. अशा व्यक्तीस लोकप्रतिनिधी म्हणणे त्यांच्या मतदारांस किती अवघड होत असेल, याची कल्पनादेखील करता येत नाही. वस्तुतः अशा व्यक्तींना नेता ही बिरूदावली कशी प्राप्त होते, हेदेखील एक कोडेच असते. जी व्यक्ती जेव्हा जनतेच्या पसंतीस पात्र ठरते, जनता त्याचे नेतृत्व मान्य करून त्यास स्वीकारते, तेव्हा त्यास नेता म्हणणे अधिक योग्य असते. अलिकडे ही प्रक्रिया उलट्या दिशेने सुरू झालेली दिसते. एखादा राजकीय पक्ष आपल्याच तंबूतील एखाद्या चेहèयावर नेता म्हणून मुखवटा चढवतो, नेता नावाचे पद देऊन कुठे तरी त्याची नियुक्ती करतो आणि ती व्यक्तीदेखील नेता म्हणून मिरवत स्वतःचे नेतेपद समाजाच्या माथी मारते, हा प्रकार राजकारणात रूढच झाला आहे. असे अनेक पक्षनियुक्त नेते राज्यात जनतेचा नेता म्हणून वावरतात आणि जनताही त्यांना नाईलाजाने स्वीकारून त्यांच्या नेतेगिरीवर चढविलेली लोकप्रतिनिधित्वाची झूल सहन करीत असते, असेच चित्र राजरोस पाहावयास मिळते.
 
 
 
 
KOKATE
 
 
 
महाराष्ट्राच्या क्रीडामंत्री पदावरून बाहेरचा रस्ता दाखविले गेलेल्या आणि आपल्या कर्तबगारीशून्य कारकीर्दीमुळे सध्या गाजत असलेल्या माणिकराव कोकाटे नावाच्या मंत्रिमहोदयांना विधिमंडळात पाठविणाèया मतदारांनाही सध्या स्वतःच्या निर्णयाची खंत वाटत असेल. संधी मिळेल तेथून उमेदवारी मिळवून विधिमंडळात स्वतःचा शिरकाव करून घेण्याच्या निव्वळ राजकारणी स्वार्थापलीकडे ज्याचे काहीही उल्लेखनीय कर्तृत्व नाही, असे हे कोकाटे नावाचे ‘माणिक’ सातत्याने लोकप्रतिनिधी म्हणून निवडताना त्यांच्या कोणत्या कर्तबगारीस मतदारांनी पसंतीची पावती दिली, हा प्रश्नच आहे. नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील एका गावात जन्मलेली, कोणताही राजकीय वारसा नसलेली एक व्यक्ती विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून काँग्रेसशी जोडली जाते आणि निव्वळ निवडणुकीतील उमेदवारीवर डोळा ठेवून पक्षकार्याचा कांगावा करीत राजकारणात बस्तान बसविते. निवडणूक लढविण्याचे स्वप्न काँग्रेसकडून पूर्ण होण्याची शक्यता नाही, असे दिसताच राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेऊन शरद पवारांशी संधान साधते; पण तेथेही उमेदवारी नाकारली गेल्याने शिवसेनेत उडी मारून सिन्नर विधानसभेची उमेदवारी मिळवून विधानसभेत दाखल होते.
 
 
स्वार्थी पक्षांतरे आणि सातत्यपूर्ण ‘गयाराम’गिरी एवढाच इतिहास असूनही या मतदारसंघात मतदारांचा कौल मिळवून विधानसभेत पदार्पण केलेल्या कोकाटेंनी दुसèयांदाही शिवसेनेकडून आमदारकी उपभोगली. नंतर नारायण राणे यांचे बोट धरून पुन्हा काँग्रेस प्रवेश करीत आणि स्वगृही परतल्याचा कांगावा करीत उमेदवारी मिळवून तिसèयांदा विधानसभा गाठली आणि चौथ्या वेळी आमदारकीसाठी भाजपाच्या तंबूत दाखल होऊन पराभव झाल्याने पाचवी निवडणूक राष्ट्रवादीच्या चिन्हानिशी लढविली. पुढे अजित पवारांच्या गटाचा आश्रय घेऊन महायुती सरकारात मंत्रिपदही मिळविले आणि आमदारकीच्या प्रदीर्घ काळात ‘घर घोटाळ्या’ व्यतिरिक्त फारसे काही कर्तृत्व न नोंदविताही केवळ वादग्रस्त व बेमुर्वत वक्तव्यांतून सतत चर्चेत राहिले. पक्षांतराचे इमले चढवत सत्तेची ऊब उपभोगणे एवढेच माणिकराव कोकाटे यांचे एकूण कर्तृत्व लक्षात घेतले, तर त्यांना निवडून देणाèया मतदारांनी आणि त्यांना थेट मंत्रिमंडळात दाखल करून घेणाèयांनाही यापुढे अशांवर नेतेपदाची झूल चढवताना आणि मंत्रिपदे बहाल करताना वारंवार विचार करावा, हेच योग्य ठरेल. कोकाटे यांनी आपल्या पूर्वेतिहासातून सत्ताधीश आणि मतदारांनाही दिलेला हा एकमेव चांगला संदेश ठरणार आहे.
 
 
 
आर्य चाणक्य हा राजनीतीचा दीपस्तंभ मानला जातो. आदर्श राजकारण कसे करावे यासाठी चाणक्यनीतीचे मार्गदर्शन घेतले जाते. याच चाणक्यनीतीच्या 16 व्या अध्यायातील एक सुभाषित माणिकराव कोकाटे नावाच्या या मंत्र्याबाबत चपखल वापरता येईल. माणिक हे मौल्यवान असते हे खरेच; पण त्याला आपले मोल मिरविण्यासाठीही सोन्याच्या कोंदणाची गरज असते. अशा अर्थाचे हे सुभाषित म्हणजे माणिकराव कोकाटेंच्या राजकीय कारकीर्दीचे नेमके वर्णन म्हणावे लागेल. माणिक नावाचे हे राजकीय रत्न आपल्या गुणांमुळे नव्हे, तर ज्यांच्या आश्रयाने राजकारणातील आपले मोल प्रस्थापित करीत गेले, त्या सोन्यालाही आता लाजेने काळवंडल्यासारखे वाटेल, असा इतिहास त्यांनी आपल्या कुकर्तृत्वाने निर्माण केला आहे. विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना माणिकराव कोकाटे नावाची मंत्रिपदावरीलही जबाबदार व्यक्ती मान खाली घालून गुपचूप मोबाईलवर रमीचा डाव खेळते, मंत्री या नात्याने ज्या सरकारचे प्रतिनिधित्व करते, त्याच सरकारची भिकारी म्हणून संभावना करते आणि ज्या शेतकèयांच्या कल्याणासाठी काम करण्याची जबाबदारी मंत्री या नात्याने शपथपूर्वक स्वीकारलेली असते, त्याच शेतकèयांना, ढेकळांचे पंचनामे करू का, असा बेमुर्वत सवाल करून आपल्या सत्तेचा माज दाखवून देते.
 
 
विधिमंडळाच्या सभागृहात रमीचा डाव खेळून सरकारची बेअब्रू केल्यानंतरही खेळाशी संबंधित असलेल्या खात्याचे मंत्रिपद भूषवून पुन्हा सत्तेच्या सान्निध्यात राहण्याचा विक्रम करते, अशा या माणिकरावांच्या दुष्कृत्यांचे घडे अखेरीस भरले. गरीब असल्याचे भासवून बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी कोट्यातून घरे लाटणे हा गुन्हा या कोकाटेंनी केला आहे, यात आता कोणताही संशय राहिलेला नाही. असे भ्रष्ट व्यवहार करून स्वतःच्या कलंकित चारित्र्याचे स्पष्ट पुरावे देणाèया व आपल्या प्रतिमेबरोबरच सत्ताधाèयांच्या प्रतिमेलाही काळे फासणाèया नेत्याला पाठीशी घालण्याचे सारे प्रयत्न फोल ठरणार, हे आधीच स्पष्ट होते. तरीही त्यांचा राजीनामा ताबडतोब म्हणावा असा घेतला गेला नाही. अखेर त्यांची हकालपट्टी झाली हे चांगलेच झाले. कोकाटेंना मंत्रिपदाच्या केबिनमधून इस्पितळमार्गे अखेरीस कोठडी गाठावीच लागणार, हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांची हकालपट्टी करणे त्यांच्या पाठीराख्यांना अखेर भाग पडले. सरकारी कोट्यातील सदनिका हडपण्यासाठी केलेली बनावटगिरी उघड झाल्याने न्यायालयाने कोकाटे यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा दिली असल्याने आपोआप त्यांची आमदारकी रद्द होणार आहेच; त्यानंतरही त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवल्यास सरकारची बेअब्रू झाली असती.
 
 
मुख्यमंत्र्यांनी सरकारची प्रतिमा राखून पाऊल उचलले हे छानच झाले. याआधी तुरुंगातूनही खात्याचा कारभार हाकणारा नवाब मलिक नावाचा मंत्री महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्राने पाहिला, तेव्हा राज्याची प्रतिष्ठा खुंटीवर टांगली गेली होती. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोप होऊ लागल्यावर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देणे भाग पडले होते. कोकाटे यांची खाती काढून घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या माणिकाभोवती असलेले सोन्याचे कोंदण दूर केले आहे. आता त्याला त्याचे कोणतेच मोल उरलेले नाही. मंत्रिपदाच्या आलिशान केबिनकडून कारागृहातील कोठडीपर्यंतचा प्रवासही आता जवळपास निश्चित झाला आहे. गुन्हा उघडकीस येऊ लागल्यानंतर प्रकृती अस्वास्थ्याचा कांगावा करीत इस्पितळे गाठण्याचा एक राजमार्ग याआधीही काही नेत्यांनी अवलंबिलेला होता. कोकाटेंचा प्रवासही तसाच दिसतो आहे. इस्पितळांतील खर्च कोण करणार हा प्रश्न विचारतानाच, दोष सिद्ध झाल्यावरही अशा लोकांवर सार्वजनिक पैशातून खर्च करावा काय, याचा विचार करायला हवाच. दुसरे म्हणजे, हे माणिक आता मंत्रिमंडळातून आणि विधिमंडळातूनही बाहेर गेल्यानंतर ती जागा भरून काढण्यासाठी नवे रत्न निवडावे लागेल. त्यालाही अशाच प्रकारचा काही इतिहास नाही ना, हे तपासण्याची काळजीही सरकारला घ्यावी लागेल. कारण एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्यहीनतेमुळे आणि प्रतिमाशून्यतेमुळे सरकारच्या प्रतिमेवर डाग लागणे शोभादायक नाही. त्यामुळे पुढचे ‘माणिक’ निवडताना सत्ताधाèयांनी काळजी घेणे केव्हाही श्रेयस्कर. असे ‘माणिक’ नकोच, अशी खूणगाठ बांधायची ती त्यासाठीच.
Powered By Sangraha 9.0