
या पाचही मुलांचे वय तीन ते पंधरा वर्षांदरम्यान असून, ते नियमितपणे याच रुग्णालयातून रक्त संक्रमण करून घेत होते. जानेवारी ते मे २०२५ या कालावधीत ही प्रकरणे घडल्याचे समोर आले असले, तरी अनेक महिन्यांपर्यंत ही बाब दडपून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आले की, मुलांना देण्यात आलेले रक्त एचआयव्ही बाधित होते आणि त्यामुळेच हा संसर्ग त्यांच्यात पसरला. 5-children-tested-hiv-positive नियमांनुसार प्रत्येक रक्तपेढीत रक्ताची काटेकोर तपासणी बंधनकारक असते. मात्र या ठिकाणी ती प्रक्रिया पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आली. याचा परिणाम म्हणून पाच निष्पाप मुले आणि त्यांची कुटुंबे आयुष्यभर न संपणाऱ्या वेदनेत ढकलली गेली. तपासणीदरम्यान बहुतेक मुलांचे आई-वडील एचआयव्ही निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे हा संसर्ग रक्त संक्रमणातूनच झाल्याची खात्री पटली.
या घटनेनंतर पीडित कुटुंबांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचे वातावरण आहे. आधीच थॅलेसीमियाशी झुंज देणाऱ्या या मुलांवर आता एचआयव्हीसारख्या गंभीर आजाराचे ओझे आले आहे. एका पीडित मुलाच्या वडिलांनी सांगितले की, आपल्या मुलाला जीव वाचवण्यासाठी रक्त चढवले, मात्र त्या प्रक्रियेमुळेच त्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले. ही रुग्णालयाची अक्षम्य चूक असल्याचे त्यांनी म्हटले. प्रकरण उघडकीस आल्यानंतर मध्य प्रदेश सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. संबंधित रुग्णालयातील दोन डॉक्टर, रक्तपेढीचा प्रभारी आणि आणखी एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले असून, तत्कालीन सिव्हिल सर्जनला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याशिवाय या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आरोग्य विभागाने उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून, सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.