अकोला,
Akola election : जिल्ह्यातील आकोट, तेल्हारा, हिवरखेड, मूर्तिजापूर, या चार नगरपरिषद व बार्शीटाकळी नगरपंचायतसाठी मंगळवार २ डिसेंबर रोजी ६७.३७ टक्के मतदान पार पडले.तर बाळापूर नगरपरिषदेसाठी शनिवार, २० रोजी मतदान होणार आहे.दरम्यान सर्व पाच नगरपरिषद व एका नगरपंचायत निवडणूकीची मतमोजणी ही रविवार,२१ रोजी सकाळी १० वाजतापासून सुरु होणार आहे. यासाठी फेऱ्या व टेबलांची संख्या निश्चित केली.
आहे.राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निर्भय, मुक्त व पारदर्शक पद्धतीने राबविण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक टप्प्यावर विशेष दक्षता घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
नगरपरिषद नगरपंचायती च्या निकालाकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून यासंदर्भात तयारी पूर्ण झाली असून नागरिकांची उत्सुकता देखील शिगेला पोहचली आहे.मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच रविवारी सुरक्षा कक्षाचे सिल उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॅमेऱ्यासमोर उघडण्यात येतील.सर्वप्रथम पोस्टल मतदानाची मोजणी होईल.त्यानंतर प्रथमफेरी निहाय मतदानयंत्रे सुरक्षा कक्षातून काढून मतमोजणी कक्षात आणली जातील.
मतमोजणी टेबलावर नियुक्त उमेदवारांचे प्रतिनिधी सिलची खात्री करून घेतल्यानंतरच संबंधित मतदानयंत्राची मतमोजणी करण्यात येणार आहे.मतमोजणीदरम्यान मतदानयंत्रातील बॅटरी लो किंवा बंद पडल्यास, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नवीन बॅटरी बसवण्यात येईल. यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी सर्व उपस्थित उमेदवार किंवा मतमोजणी प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या घेतील.मतमोजणी वेळी आक्षेपाला देखील उमेदवारांना संधी मिळणार आहे.पूर्ण फेऱ्या झाल्यानंतर नगराध्यक्षाचा निकाल घोषित करण्यात येईल. दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम निकाल येण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.या निवडणुकीत १ लाख २२ हजार ४५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
या ठिकाणी मतमोजणी
आकोट-ट्रायसेम सभागृह आयटीआय पोपटखेड रोड
मूर्तिजापूर-नगरपरिषद मूर्तिजापूर इमारत क्र ४
बाळापूर-शासकीय धान्य गोदाम, खामगाव नाका, बाळापूर
तेल्हारा-डॉ.केशव हेडगेवार मंगल कार्यालय हिवरखेड रोड
हिवरखेड-तालुका शेतकी खरेदी विक्री संस्था कार्यालय, हिवरखेड येथील हॉल
बार्शीटाकळी-नगरपंचायत कार्यालय बार्शीटाकळी
न.प. एकूण टेबल एकूण फेरी
आकोट १२ ९
मूर्तिजापूर ६ १२
बाळापूर १२ ४
तेल्हारा ५ ५
हिवरखेड ५ ५
बार्शीटाकळी(न.पं.) ४ ८
एकुण ४४ ४३
उमेदवारांची धाकधूक वाढली
दोन डिसेंबर रोजी मतदान पार पडले त्यानंतर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती मात्र राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशाप्रमाणे मतमोजणी ही १८ दिवसांवर म्हणजेच २१ डिसेंबर पर्यंत जावून पोहोचली. उद्या रविवारी सकाळी दहा वाजता पासून मतमोजणीला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.त्यामुळे मतदान यंत्रातून कोणाचे भाग्य खुलणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.