मोरेश्वर बडगे
Municipal elections : महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. 15 जानेवारीला मतदान आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मतमोजणी होऊन निकाल लागतील. 23 डिसेंबरला उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होईल. 30 डिसेंबरपर्यंत ते चालेल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 2 जानेवारी आहे. म्हणजे 2 जानेवारीला निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. महायुती विरुद्ध ठाकरे बंधू अशी ही लढाई आहे. काँग्रेस स्वबळावर लढते आहे. एकूण 29 महापालिकांच्या निवडणुका आहेत. पण खरी चुरस मुंबई महापालिकेसाठी आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 50 हजार कोटी रुपयांपेक्षा मोठा आहे. कुठल्याही राज्याच्या अर्थसंकल्पापेक्षा हा आकडा मोठा आहे. दिल्लीपेक्षा मोठा आहे.
त्याशिवाय दरवर्षी केंद्र सरकारकडून विविध योजनांसाठी मिळणारे अनुदान वेगळे. एकूण वर्षाला दीड लाख कोटी रुपयाचे अर्थकारण आहे. मुंबईला सोन्याची कोंबडी म्हणतात ती उगाच नव्हे. सोन्याच्या कोंबडीची ही महापालिका गेली 25 वर्षे शिवसेनेच्या म्हणजे ठाकरे कुटुंबाच्या ताब्यात होती. यावेळी प्रथमच तिच्यापुढे भाजपाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाशी गद्दारी करून उद्धव शरद पवार यांच्या मांडीवर जाऊन बसले. त्या बदल्यात त्यांनी अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद जरूर मिळविले. पण त्याच्या बदल्यात सर्वस्व गमावले. सरकार गेले, पक्ष गेला, निवडणूक चिन्ह गेले. उद्धव एकदम रिकामे झाले आहेत. वर्षभरापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव यांच्या शिवसेनेनं मार खाल्ला. फक्त 20 आमदार निवडून आले. त्यातले 10 मुंबईतले आहे. सारे पत्ते उलटे पडले आहेत. आता तर मुंबई महापालिकेच्या रूपाने हाती असलेले ‘एटीएम’सुद्धा हातून हिसकले जाण्याची वेळ येऊ घातली आहे. एकनाथ शिंदे यांनी पळविलेली शिवसेना परत मिळवायची असेल तर उद्धव यांना ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकावीच लागेल. मुंबई हरले तर उद्धव ठाकरे संपले. बुडण्याआधीची अखेरची धडपड त्यांनी चालवली आहे.
गाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना यांच्याशी आहे. याआधी 2017 साली झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा विरुद्ध शिवसेना असा संघर्ष झाला होता. राज्यात भाजपा आणि शिवसेना युतीचे सरकार असतानाही दोघे एकमेकांविरुद्ध लढले होते. शिवसेना तेव्हा फुटायची होती. शिवसेनेला 84 तर भाजपाला 82 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेने सत्ता राखली होती. फडणवीस यांनी तेव्हा मनात आणले असते तर जुगाड करून मुंबई महापालिकेची सत्ता ताब्यात घेतली असती, पण त्यांनी मोठे मन केले. उद्धव यांना ते समजले नाही. पुढे ते शरद पवारांच्या नादी लागले. पवारांनी उद्धव यांची नाजूक नस हेरली. काँग्रेसला तयार केले. उद्धव, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा विचित्र खिचडीचे सरकार सत्तेत आले. ते चालणार नव्हतेच. अडीच वर्षात कोसळले. आज उद्धव एकटे आहेत. काँग्रेसने त्यांना सोडले. काँग्रेस स्वबळावर लढते आहे. काँग्रेसवाल्यांना टेन्शन नाही. हरण्याची त्यांना सवय झाली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईत फारशी ताकद नाही. असून नसून सारखे. कुणीच सोबत नाही म्हटल्यावर उद्धव यांना घाम फुटला असणार. शेवटचे शस्त्र म्हणून त्यांनी आपल्या चुलत भावाला म्हणजे राज ठाकरे यांना सोबत घेतले आहे. तब्बल 20 वर्षांनंतर दोन ठाकरे एकत्र आले आहेत.
मराठी अस्मितेच्या मुद्यावर एकत्र आले आहेत. दोघांच्या राजकीय युतीची चर्चा आहे. उद्धव या युतीसाठी उतावळे आहेत. मात्र, राज ठाकरे यांनी अजून आपले पट्टे उघड केलेले नाहीत. जागावाटप हा दोघांमध्ये कळीचा मुद्दा आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेने म्हणजे मनसेकडे सध्या एकही खासदार, आमदार तर सोडा साधा नगरसेवकही नाही. अशा स्थितीत उद्धव ठाकरे भावासाठी किती जागा सोडणार आणि कोणत्या जागा सोडणार? दोघांमध्ये चर्चेचं गुèहाळ सुरू आहे. शिवसेनेतील फुटीनंतर तब्बल 40 पेक्षा अधिक माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आहेत. उद्धव यांच्याकडे उरलेल्यातल्या 30 माजी नगरसेवकांच्या जागा राज ठाकरे यांनी मागितल्या आहेत.
उद्धव त्या देतील? नाजूक मुद्दा आहे, पण दुसरा मार्ग नाही. कारण परतीचे दोर केव्हाच कापले गेले आहेत. आता हे दोन भाऊ वेगळे लढतो म्हटले तर लोकांना ते आवडणार नाही. त्यांनाही ते कळते. पण वळलेले नाही. पाच दिवसांनी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होत आहे. पुढे प्रचाराला फक्त 13 दिवस मिळणार आहेत. पण ठाकरे बंधूंची कसलीही तयारी नाही. रणनीती नाही. मेहनत घेणार नाही, लोकांकडे जाणार नाही तर मतं मिळणार कशी? ‘आपल्याबद्दल मुंबईकरांची खूप सहानुभूती आहे, ठाकरे ब्रँड आपल्याला वाचवेल’ असे उद्धव यांना वाटते. लढण्याची इच्छाच राहिली नाही, असे उद्धव यांच्याकडे पाहून वाटते. निवडणुका जिंकायच्या नाहीत, लढण्याचा देखावा मात्र करायचा. निकालानंतर ईव्हीएम, व्होटचोरी, मतदार याद्यांमधला घोळ या नावाने ओरडत सुटायचे. निवडणूक जिंकायचे एक तंत्र असते. संघटन लागते, प्रचार लागतो, घराघरात पोचावं लागतं यापैकी कुठल्याही आघाडीवर ठाकरे सेनेचा थांगपत्ता नाही. मराठी अस्मितेच्या नावावर मतं मागायची आणि राज्यसभेवर अमराठी माणसे पाठवायची हा यांचा मराठी बाणा मराठी माणूस पाहत आला. लोक या ढोंगीपणाला कंटाळले आहेत.
ठाकरे बंधूंच्या तुलनेत महायुतीची तयारी पाहा. भाजपाची सारी तयारी झाली आहे. अखेरचा हात फिरविणे बाकी आहे. फडणवीस यांनी आखलेली रणनीती तर फुलप्रूफ आहे. महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचे त्यांनी तीन महिन्यांपूर्वीच सांगितलं आहे. एकी होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढती होतील, असे सांगून फडणवीस मोकळे झाले. फडणवीस यांचा हा चक्रव्यूह अभेद्य असा आहे. पूर्वी काँग्रेसवाले असेच लढायचे. काँग्रेसमधलेच दोन गट लढायचे. त्यांच्यातलाच एक निवडून यायचा. तिसèयाला घुसूच देत नव्हते. फडणवीस यावेळी हाच डाव खेळत आहेत. भाजपा आणि शिंदे सेना एकमेकांशी लढली तरी शेवटी महायुतीच जिंकणार. म्हणजे सीट घरातच. नगरपालिका निवडणुका अशाच रणनीतीतून लढल्या गेल्या. कोकणातल्या कणकवलीचं उदाहरण बोलकं आहे.
तेथे राणे बंधू आपसात लढले. निवडणुकीनंतर ‘रवींद्र चव्हाण हे माझे मोठे बंधू’ म्हणत नीलेश राणे पुढे आले. दोघांच्या लढतीत तिसèयाच फायदा होऊ नये म्हणून फडणवीस यांनी हा फॉर्म्युला शोधला आहे. पुणे, पिंपरी चिंचवड येथे भाजपा आणि अजितदादांची राष्ट्रवादी याच फॉर्म्युल्यात आमनेसामने उतरले आहेत. मुंबईमध्ये उद्धव आणि राज ठाकरे यांची मतं फोडायचे डावपेच फडणवीस यांनी योजिले आहेत. शिंदे सेनेने 4-5 हजार मतं घेतली तरी ठाकरे सेनेच्या 10 ते 15 जागा कमी होऊ शकतात. अजितदादांच्या राष्ट्रवादीला वेगळे उभं राहायला सांगितलं आहे. दादांचे उमेदवार ठाकरे बंधूंचीच मतं खातील. कोणता अजेंडा चालेल? ठाकरे बंधूंच्या मराठी अस्मितेचा की भाजपाच्या विकासाचा? मुंबईत मराठी मतदार 38 टक्के आहे. दुसèया क्रमांकावर मुसलमान 23 टक्के आहेत. विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांनी ठाकरे सेनेला भरभरून मतं दिली होती. 50 वार्डांमध्ये मुस्लिम मतं निकाल फिरवू शकतात. ठाकरे सेना जिंकली तर एखादा खान महापौर होऊ शकतो, असे भाजपाकडून सांगितले जात आहे. 17 टक्के उत्तर भारतीय मतदार आहेत. 15 टक्के गुजराती, राजस्थानी आहेत. मुंबईत 227 जागा आहेत. बहुमतासाठी 114 नगरसेवक पाहिजेत. गेल्या निवडणुकीत भाजपाला 82 जागा मिळाल्या होत्या. यावेळी भाजपची तयारी आणि व्यूहरचना पाहता फडणवीस मैदान मारतील. एकूणच मुंबईची निवडणूक अतिशय चुरशीची आणि रोमहर्षक होणार आहे. नुकताच आलेला ‘धुरंधर’ नावाचा सिनेमा सध्या धुमाकूळ घालतो आहे. मुंबईतही निवडणुकीची धूम आहे. कोण होणार मुंबईचा ‘धुरंधर?’