अनिल कांबळे
नागपूर,
MSEDCL नवीन हाॅटेलसाठी ‘थ्री फेज’ वीज कनेक्शन मंजूर करून देण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या एका सहाय्यक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. अविनाश लक्ष्मण दांडेकर (34) असे अटक करण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव असून, या कारवाईने महावितरण विभागात खळबळ उडाली आहे. लांडेकर याच्या घराची झडती एक पथक करीत आहे.
तक्रारदार व्यक्तीला येरखेडा परिसरात आपले नवीन हाॅटेल आणि रेस्टाॅरंट सुरू करायचे हाेते. यासाठी त्यांनी कामठी येथील महावितरण कार्यालयात रीतसर अर्ज केला हाेता. मात्र, कामाची साईट व्हिजिट करणे आणि फाईल लवकर मंजूर करण्याच्या नावाखाली सहाय्यक अभियंता अविनाश दांडेकर याने तब्बल 1 लाख 10 हजार रुपयांची मागणी केली हाेती. आराेपी अभियंत्याने यापूर्वीच तक्रारदाराकडून 1 लाख रुपये उकळले हाेते. मात्र, तरीही त्याचे समाधान झाले नाही. उर्वरित 10 हजार रुपयांसाठी त्याने वारंवार तगादा लावला हाेता. अखेर कंटाळून तक्रारदाराने नागपूर एसीबीकडे धाव घेतली.
महावितरण कार्यालयातच अटक
मिळालेल्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, एसीबीच्या पथकाने गुरुवारी कामठी येथील महावितरण कार्यालयात सापळा रचला. दुपारी जेव्हा तक्रारदाराने उर्वरित 10 हजार रुपये दांडेकरला दिले, त्याच वेळी दबा धरून बसलेल्या पथकाने त्याला रंगेहाथ अटक केली. आराेपीविरुद्ध कामठी पाेलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दांडेकर याची कारकिर्द वादग्रस्त राहिली असून लाच घेतल्याशिवाय ताे करीत नव्हता, अशी चर्चा आहे.