पीएम मोदींचा ट्विटरवर दबदबा; टॉप 10 पैकी 8 सर्वाधिक लाईक झालेले ट्विट्स पंतप्रधानांचेच

19 Dec 2025 13:08:16
नवी दिल्ली,   
pm-modi-on-twitter सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (माजी ट्विटर) ने अलीकडेच एक नवे फीचर सुरू केले असून, त्यामध्ये दर महिन्याला एखाद्या देशातील सर्वाधिक लाईक मिळालेल्या पोस्ट्सची यादी दाखवली जाते. या नव्या फिचरमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ठळकपणे दिसून येत आहे. भारतात गेल्या ३० दिवसांत सर्वाधिक पसंती मिळालेल्या ट्विट्सच्या यादीत टॉप १० पैकी तब्बल ८ ट्विट्स पंतप्रधान मोदींचे आहेत. विशेष म्हणजे या यादीत देशातील इतर कोणत्याही राजकीय नेत्याचे ट्विट स्थान मिळवू शकलेले नाही.
 
pm-modi-on-twitter
 
X कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या यादीत सर्वाधिक लाईक मिळालेल्या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना रशियन भाषेत भगवद्गीतेची प्रत भेट दिल्याचा फोटो आणि संदेश अव्वल ठरला आहे. या ट्विटला सुमारे २३ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून, त्याची रीच सुमारे ६.७ मिलियनपर्यंत पोहोचली आहे. याशिवाय जवळपास २९ हजार युजर्सनी हे ट्विट रीपोस्ट केले आहे. X प्लॅटफॉर्मने नुकतेच प्रत्येक देशातील महिन्याभरात सर्वाधिक लाईक झालेले ट्विट्स दाखवणारे हे नवे फीचर सुरू केले आहे. या माध्यमातून त्या देशातील सोशल मीडियावरील चर्चेचे आणि लोकप्रियतेचे चित्र स्पष्टपणे समोर येते. भारताच्या बाबतीत पाहिले असता, गेल्या ३० दिवसांत सर्वाधिक पसंती मिळालेल्या १० ट्विट्सपैकी ८ ट्विट्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली असल्याचे समोर आले आहे. एलन मस्क यांच्या मालकीच्या X प्लॅटफॉर्मवर दरवर्षीही जागतिक पातळीवर सर्वाधिक लाईक झालेले ट्विट्सची यादी जाहीर केली जाते. मात्र नव्या मासिक फिचरमुळे देशनिहाय लोकप्रियता अधिक स्पष्टपणे समजण्यास मदत होत असून, त्यात भारतात पंतप्रधान मोदींचे सोशल मीडिया वर्चस्व कायम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
Powered By Sangraha 9.0