विकासासाठी भाजप, भावना मात्र गांधी कुटुंबाशीच!

19 Dec 2025 15:26:18
मुंबई,
Pragya Satava's clear opinion काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रज्ञा सातव यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना विकास हाच पक्षबदलामागचा एकमेव हेतू असल्याचे सांगितले आहे. भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याबद्दल मनात अपार आदर असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. काँग्रेस पक्षाने दोन वेळा विधानपरिषदेत जाण्याची संधी दिली, त्यामागे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा मोठा वाटा असून ते दोघे आजही आपल्यासाठी दैवतासमान असल्याचे प्रज्ञा सातव म्हणाल्या.
 

pradnya satav 
गुरुवारी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रज्ञा सातव यांनी हिंगोली येथे भाजप नेते मुटकुळे यांच्या कार्यालयाला भेट दिली. यानंतर त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना काँग्रेस सोडण्यामागील कारणांवर सविस्तर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, भाजप कार्यकर्त्यांनी आपले आणि आपल्या कुटुंबाचे अत्यंत प्रेमाने स्वागत केले असून, या प्रतिसादामुळे आपण भावूक झालो आहोत. येत्या काळात राजूभाऊंचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
आपली आमदारकीची मुदत शिल्लक असताना काँग्रेस सोडण्याच्या प्रश्नावर प्रज्ञा सातव यांनी जिल्ह्यातील विकासाचा मुद्दा पुढे केला. कळंबोली भागात अद्याप अनेक विकासकामांचा अनुशेष असून, विशेषतः शेतकरी आणि सिंचनाशी संबंधित प्रश्न प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक कार्यकर्ते विकासाच्या प्रतीक्षेत आहेत आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. समृद्धी महामार्गासारख्या प्रकल्पांमुळेच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
काँग्रेस पक्षाने आपल्याला दोनदा विधानपरिषदेवर पाठवले, हे आपण कधीही नाकारणार नसल्याचे प्रज्ञा सातव यांनी स्पष्ट केले. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या आशीर्वादामुळेच आमदारकी मिळाली आणि ते दोघेही राजीव सातव व रजनी सातव यांच्याप्रमाणेच आपल्या मनात कायम राहतील, असे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले. मॅडम आणि बॉस हे माझ्यासाठी देवासारखेच आहेत, असेही त्या म्हणाल्या.
Powered By Sangraha 9.0