जयपूर,
Save Aravalli Campaign ‘अरवली वाचवा’ मोहिमेच्या आह्वानामुळे राजस्थानातच नाही तर संपूर्ण देशात चर्चेला उधाण आले आहे. रस्त्यावरच्या निदर्शनेपासून सोशल मीडियापर्यंत, या मुद्द्याला जोर मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय वाळू कलाकार अजय रावत यांनी 100 टनाहून अधिक वाळू वापरून एक भव्य कलात्मक शिल्प निर्माण केले, ज्यात अरवली पर्वतरांगांना राजस्थानची जीवनरेखा म्हणून दर्शवण्यात आले आहे. शिल्पाचे दर्शन घेण्यासाठी स्थानिक तसेच पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित झाले. अजय रावत म्हणाले की, ही वाळू कला जनजागृती वाढवण्यासाठी आणि सरकारला चिंता व्यक्त करण्यासाठी एक शांततापूर्ण प्रयत्न आहे.
केंद्र सरकारने अरवली पर्वतरांगांची नवीन वैज्ञानिक व्याख्या प्रस्तावित केली आहे. या नव्या निकषानुसार, फक्त 100 मीटर किंवा त्याहून उंच असलेल्या टेकड्यांना ‘अरवली’ मानले जाईल. या निकषामुळे अरवली प्रदेशाचा मोठा भाग संरक्षणापासून वंचित राहणार आहे, ज्यामुळे खाणकाम आणि बांधकाम उपक्रमांना मार्ग मोकळा होईल. तज्ञांच्या मते, याचा भूजल पातळी, हवामान संतुलन आणि जैवविविधतेवर गंभीर परिणाम होईल, त्यामुळे स्थानिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनीही या मोहिमेत सहभाग घेतला आहे. त्यांनी सोशल मीडियावर आपली प्रोफाइल पिक्चर बदलून अरवली बचाव मोहिमेचा संदेश दिला आणि नवीन व्याख्येचा निषेध व्यक्त केला. गेहलोत यांनी म्हटले की, अरवलीच्या संवर्धनासाठी घेतलेले हे बदल उत्तर भारताच्या भविष्यासाठी गंभीर प्रश्न निर्माण करतात. अरवली टेकड्या भारतातील सर्वात जुन्या पर्वतरांगांपैकी एक असून राजस्थानपासून दिल्ली-एनसीआर आणि गुजरातपर्यंत पसरलेल्या या पर्वतरांगेला फक्त भौगोलिक महत्त्व नाही, तर हवामान, पर्यावरण आणि जीवन व्यवस्थेसाठी कणा मानले जाते. या पर्वतरांगांमुळे थार वाळवंटातून येणारी धूळ, उष्ण वारे आणि प्रदूषण दिल्ली-एनसीआर आणि गंगेच्या मैदानापर्यंत पोहोचण्यापासून रोखले जाते. पर्यावरण तज्ञांचा असा अंदाज आहे की, अरवली पर्वतरांग कमकुवत झाल्यास वायू प्रदूषण, तापमान वाढ आणि पाण्याची कमतरता अधिक तीव्र होईल, त्यामुळे याला ‘उत्तर भारताचे नैसर्गिक वायू फिल्टर’ म्हटले जाते.
अरवली पर्वतरांग जैवविविधतेसाठीही महत्त्वाची आहे. येथे बिबटे, कोल्हे, हरण, शेकडो पक्ष्यांच्या प्रजाती आणि औषधी वनस्पती आढळतात. येथील जंगल कार्बन शोषण, माती संवर्धन आणि स्थानिक पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत करतात. परंतु अलीकडे वृक्षतोड, जमीन साफ करणे, बेकायदेशीर खाणकाम आणि बांधकामामुळे वनस्पतींचे नुकसान झाल्याचे अहवाल समोर आले आहेत. अरवलींचे भविष्य आता केवळ पर्यावरणीय विषय नाही, तर हवामान, सार्वजनिक आरोग्य आणि प्रादेशिक शाश्वततेचा प्रश्न बनला आहे. आज घेतलेले निर्णय येणाऱ्या पिढ्यांच्या जीवनावर थेट परिणाम करू शकतात, अशी तज्ज्ञांची चेतावणी आहे.