युगपुरुषाचा आठव

19 Dec 2025 06:00:00
विशेष
अशोक टंडन
atal-bihari-vajpayee : अटलबिहारी वाजपेयी 27 ऑगस्ट 2000 रोजी पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयात गेले होते. ग्वाल्हेरमध्ये 1939 मध्ये ज्यांनी त्यांना स्वयंसेवक बनवले, असे संघप्रचारक नारायणराव तरटे यांची त्यांनी तेव्हा भेट घेतली होती. अटलबिहारी वाजपेयी यांना माजी पंतप्रधान, कवी आणि राजकारणी म्हणून सर्वजण ओळखतात, पण त्यांचे आत्मिक आणि वैचारिक नाते संघापासूनच सुरू झाले होते. कॉलेजमध्ये असतानापासून त्यांनी संघाच्या शाखेत जायला सुरुवात केली होती आणि तेथूनच त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जाणिवेचा आरंभ झाला होता. अटलजी आणि संघ यांचे नाते संघटनात्मक असण्याखेरीज सखोल वैचारिक, सांस्कृतिक आणि भावनात्मक अशा स्वरूपाचे होते. अटलजी अनेकदा म्हणायचे की, संघाने मला देश आणि समाजासाठी जगायला शिकवले.
 
 

ATALJI 
 
 
 
संघाच्या विचारांनी, शिस्तीने आणि राष्ट्रवादाने ते अत्यंत प्रभावित होते. 1951 मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना झाली तेव्हा संघाने अटलजींना राजकीय मंचावर संघटनेचा चेहरा बनण्यास सहकार्य केले. त्यावेळी संघाचे दुसरे सरसंघचालक श्रीगुरुजी गोळवलकर होते. श्रीगुरुजी हे विचारवंत, तपस्वी आणि दूरदर्शी नेते मानले जात होते. श्रीगुरुजींच्या व्याख्यानांनी आणि विचारधारेने प्रभावित झालेल्या पिढीतील स्वयंसेवकांमध्ये अटलजींचा समावेश होतो. त्यांनी गुरुजींच्या वाणीतून, जीवनशैलीतून आणि राष्ट्रभक्तीतून प्रेरणा घेतली आणि ती आपल्या राजकीय जीवनात आत्मसात केली. अटलजींनी स्वतः कबूल केले होते की, श्रीगुरुजी हे त्यांच्या वैचारिक संस्कारांचे मूलाधार आहेत.
 
 
संघाच्या ज्या स्वयंसेवकांनी पुढे राजकारणात प्रवेश केला, त्यांत अटलजी सर्वांत प्रतिभावान मानले जात होते. श्रीगुरुजींनाही हे स्पष्टपणे माहीत होते. अटलजी आणि श्रीगुरुजी यांच्यातील संबंध मार्गदर्शक-शिष्य या भावाने जोडलेला होता. अटलजी हे श्रीगुरुजींना द्रष्टा, संघ-परंपरेतील ऋषी आणि एक प्रेरणा-पुरुष म्हणून पाहत असत.
 
 
1973 मध्ये जेव्हा श्रीगुरुजींचे निधन झाले, तेव्हा अटलजींनी त्यांना अत्यंत भावपूर्ण शब्दांत श्रद्धांजली वाहिली होती. ते म्हणाले होते, ‘गुरुजी केवळ एका संघटनेचे प्रमुख नव्हते, ते एका विचारधारेचे वाहक, एक युगद्रष्टा आणि एक तपस्वी कर्मयोगी होते. त्यांनी भारतमातेची सेवा हेच जीवनाचे एकमेव उद्दिष्ट बनविले होते.’ त्यानंतरच्या सरसंघचालकांशीदेखील अटलजींनी अतिशय आत्मीय असे संबंध ठेवले आणि संघाच्या संस्काराचे स्मरण आयुष्यभर ठेवत देशकार्याला वाहून घेतले.
 
 
अटलजींचा वारसा
 
 
युगपुरुष भारतरत्न अटलबिहारी वाजपेयींची 93 वर्षांची जीवनलीला 16 ऑगस्ट 2018 रोजी समाप्त झाली आणि भारताच्या राजकीय क्षितिजावरील अद्वितीय नक्षत्र लुप्त झाले. युगपुरुष अटलजी देशाच्या राजकारणात एक अशी पोकळी सोडून गेले, जी कधीही भरून काढता येणार नाही.
 
 
परंतु, अटलजींची विचारशैली ध्रुवतारा बनून विद्यमान आहे. आपणा सर्वांना प्रेरणा देत आहे आणि पुढेही देत राहील. अटलजींनी आपले आदर्श, ओजस्वी वाणी, साहित्यिक वारसा आणि व्यवहारकुशलतेने जवळपास पाच पिढ्यांना प्रेरित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अमित शाह, राजनाथ सिंह आणि अन्य अनेक नेत्यांनी अटलजींच्या अंतिम यात्रेत अनेक किलोमीटर पायी चालून आपल्या दिवंगत नेत्याला श्रद्धांजली वाहिली होती आणि जगाला संदेश दिला होता की, अटलजींचे विचार अमर आहेत.
Powered By Sangraha 9.0