हिरवाशार असणारा तांबट पक्षी

19 Dec 2025 14:40:57
barabet bird हिरव्या रंगाचा बार्बेट अर्थात तांबट पक्ष्याचा गळा पिवळा असून पोटाखालचा भाग हिरवट पिवळसर असल्याचे निदर्शनास येते. चिमणीच्या चोचीपेक्षा या तांबटची चोच थोडी जाड असते. त्याच्या आवाजाचे वैशिष्ट्य असे की, एखाद्याने पत्रा ठोकताना जसा आवाज होतो तसा टकटक आवाज सतत निरंतर आसमंतात घुमत राहतो.
 

बार्बेट  
 
 
गडचिरोलीपासून थोडे दूर अंतरावर आम्ही पहाटेची हवा खाण्यासाठी नेहमीच जात असू किंवा सायंकालीन फेरफटका मारायला तर हमखास जायचो, तेव्हा 'टॉक-टॉक' असा आवाज ऐकायला यायचा. कोणता पक्षी असेल बरं, म्हणून अनेक पुस्तकं चाळली. अखेर काही पक्षिप्रेमींकडून कळलं, आपण गावखेड्यात सायंकाळचे गावापासून थोडे दूर फिरत असताना असा वेगळाच आवाज कानात घुमतो. कुठे काम चालू असेल, तेथील एखाद्या इंजीनचा आवाज असेल, असेही वाटत असावे. पण खरं तर 'टॉक टॉक' हा आवाज तांबट पक्ष्याचा असतो. हिरवाशार असणारा तांबट पक्षी आपल्या साधारण दिसणाऱ्या चिमणीएवढा छोटासा पक्षी आहे. सहज म्हणून तो कोणाच्याही नजरेला पडत नाही. दिसण्यापेक्षा आपल्या आवाजानेच परिसरात आपले अस्तित्व निर्माण करणारा हा पक्षी आहे. या पक्ष्याची ओळख म्हणजे त्याच्या नाकाजवळ आणि चोचीनजीक तुरळक जाड केस आलेले असून ते मिशांसारखे वाटतात. याचवरून त्याचे शास्त्रीय नाव 'बार्बेट' असे पडले असावे. फ्रेंच भाषेत दाढीला बार्बेट म्हणतात, हे येथे उल्लेखनीय। तांबट पक्ष्याच्या गळ्याजवळ व कपाळावरसुद्धा एक लाल ठिपका असल्याचे आपल्या लक्षात येते. हिरव्या रंगाचा बार्बेट अर्थात तांबट पक्ष्याचा गळा पिवळा असून पोटाखालचा भाग हिरवट पिवळसर असल्याचे निदर्शनास येते. चिमणीच्या चोचीपेक्षा या तांबटची चोच थोडी जाड असते.barabet bird त्याच्या आवाजाचे वैशिष्ट्य असे की, एखाद्याने पत्रा ठोकताना जसा आवाज होतो तसा टकटक आवाज सतत निरंतर आसमंतात घुमतराहतो. त्याचे दर्शन दुर्मिळतेत मोजले जाते. कधी कुणाला क्वचित तांबट दिसून येतो. झाडांवर बुलबुल, ब्राह्मणी मैना असे कित्येक पक्षी विहार करतात; पण 'टॉक-टॉक' असा एक आवाजही त्यात सतत कानावर आदळतो. लहानसा तांबट या अनेक पक्ष्यात कुठेतरी आपले हे कार्य करीत असतो. वड, पिंपळ, उंबराच्या झाडांवर सायंकाळच्या वेळी अशा अनेक पक्ष्यांमध्ये हा पक्षी केवळ आवाजाने लक्ष वेधून घेतो. सुतार पक्ष्याचे साम्य या पक्ष्यात आपल्याला दिसून येते. पिंपळासारख्या एखाद्या झाडाला भलेमोठे छिद्र पाडून त्यात घरटं बांधतो; जे जमिनीपासून दहा-बारा फूट उंचावर असते.
Powered By Sangraha 9.0