नव्या बांगलादेशात हिंसेला स्थान नाही!

19 Dec 2025 15:32:11
बांगलादेश,   
There is no place for violence in the new Bangladesh. बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचार आणि अस्थिरतेवर मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने पहिल्यांदाच ठाम भूमिका मांडली आहे. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात सरकारने देशातील सर्व प्रकारच्या हिंसक घटना, धमक्या, जाळपोळ आणि मालमत्तेच्या नाशाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अशा कृत्यांमुळे देशाची लोकशाही प्रक्रिया धोक्यात येत असल्याचा इशाराही सरकारने दिला आहे. युनूस सरकारने स्पष्ट केले आहे की, सध्याचा काळ बांगलादेशासाठी अत्यंत निर्णायक आहे आणि काही समाजविरोधी घटकांकडून निर्माण केली जाणारी अराजकता देशाला चुकीच्या दिशेने नेऊ शकते.
 
muhammad yunus angry
 
 
शांतता नाकारणाऱ्या आणि हिंसाचार पसरवणाऱ्या लोकांना कोणत्याही परिस्थितीत मोकळे सोडले जाणार नाही, असे सरकारने ठामपणे सांगितले. देशाच्या भविष्यासाठी संयम, जबाबदारी आणि द्वेषाचा पूर्णपणे त्याग करण्याची गरज असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनात शहीद शरीफ उस्मान हादी यांच्या बलिदानाचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यांच्या स्वप्नातील बांगलादेश साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने हिंसाचाराला विरोध केला पाहिजे, असे सरकारने आवाहन केले आहे. हादी यांच्या बलिदानाचा खरा सन्मान म्हणजे शांतता आणि एकतेची वाट स्वीकारणे, असे सरकारचे म्हणणे आहे.
 
मायमनसिंग येथे नुकत्याच घडलेल्या एका हिंदू व्यक्तीच्या लिंचिंग घटनेचा सरकारने तीव्र निषेध केला आहे. अशा प्रकारच्या हिंसाचाराला नव्या बांगलादेशात कोणतेही स्थान नसल्याचे स्पष्ट करत, या घृणास्पद गुन्ह्यातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत वाचवले जाणार नाही, असा ठाम इशारा देण्यात आला आहे. या नाजूक टप्प्यावर प्रत्येक नागरिकाने हिंसाचार, चिथावणीखोर वक्तव्ये आणि द्वेष यांचा ठामपणे विरोध करावा, असे आवाहनही सरकारने केले आहे.
याआधी गुरुवारी रात्री एका फेसबुक पोस्टद्वारे काही संघटनांनी विध्वंस आणि जाळपोळ करून बांगलादेशला अपयशी राज्य बनवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप केला होता. आगामी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील अस्थिरतेचा फायदा नेमका कोणाला होतो, याचा विचार करण्याचे आवाहनही या पोस्टमध्ये करण्यात आले होते. देशाची स्थिरता टिकवण्यासाठी सरकारला सहकार्य करण्याची आणि हिंसाचारापासून दूर राहण्याची गरज असल्याचेही त्यात नमूद करण्यात आले होते.
Powered By Sangraha 9.0