तभा वृत्तसेवा
वणी,
ravi-dumane-suicide-case : येथील वार्ताहर व शेतकरी रवी आनंदराव दुमणे (वय 53, विद्यानगरी) यांच्या आत्महत्ये प्रकरणी नवीन वळण मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्यापूर्व डायरीत लिहिलेल्या सुसाइड नोटवरुन मृतकाच्या पुत्राने वणी पोलिस ठाण्यात वणी येथील एका व्यवसायीसह 5 जणांविरुद्ध वडिलांची आर्थिक फसवणूक, मानसिक छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दिली आहे. रवी दुमणे यांनी 15 डिसेंबर 2025 रोजी आपल्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
तक्रारीनुसार, मृतक शेतकरी खुशाल उर्फ रवी दुमणे हे कर्जबाजारी असल्याने त्यांनी स्वतः खरेदी केलेले शेत विकण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे ओळखीचे विक्रम उर्फ विक्की तुलसीदास नानवाणी याने शेत खरेदी करण्याचा तोंडी व्यवहार केला. विश्वासातून 2018 साली मारेगाव दुय्यम निबंधक कार्यालयात मृत शेतकरी व त्यांच्या पत्नीची सही घेण्यात आली. पण प्रत्यक्ष विक्री न करता संबंधित आरोपींनी संगनमत करून यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, गडचांदूर शाखेत मृत शेतकèयाच्या व त्यांच्या पत्नीच्या नावावर मोठे कर्ज उचलल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
मृत शेतकèयाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या डायरीत फसवणूक, बँकेच्या नोटिसा आणि कर्जाच्या ताणाला कंटाळून आपण टोकाचे पाऊल उचलत असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. आरोपी विक्रम नानवाणी यांच्यामुळे आपल्याला प्रचंड मानसिक त्रास झाल्याचे त्यात नमूद केले आहे. हे कर्ज आपण कधीही स्वतः घेतले नसून, त्याची कोणतीही माहिती नसल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे.