‘आर्टिस्ट रेसिडेन्सी’ कार्यशाळेची उत्साहात सुरुवात

02 Dec 2025 18:41:16
नागपूर, 
Artist Residency Workshop : शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, नागपूर यांच्या वतीने दिनांक १ ते ५ डिसेंबरदरम्यान आयोजित पाच दिवसीय ‘आर्टिस्ट रेसिडेन्सी’ कार्यशाळेचे भव्य उद्घाटन उत्साहात पार पडले. उपयोजित कला तसेच रेखा व रंग कला विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. कार्यशाळेचे प्रमुख आकर्षण म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पोर्ट्रेट पेंटर विजय आचरेकर विद्यार्थ्यांना लाईव्ह मॉडेलद्वारे पोर्ट्रेट स्टडी, ड्रॉईंग आणि पेंटिंगची प्रात्यक्षिके देत खास मार्गदर्शन करीत आहेत. प्रकाश-छाया, निरीक्षणशक्ती आणि रचना यांचा थेट अनुभव मिळणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह आहे. तसेच नामांकित उपयोजित कलावंत व प्रसिद्ध आर्ट डायरेक्टर सुनील महाडिक यांनी उद्योगजगत, डिझाइन प्रक्रिया आणि व्यावसायिक कलानिर्मितीतील बारकाव्यांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
 
 
 
artist-recidency
 
अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ साबळे यांनी उद्घाटनावेळी कलानिर्मितीत प्रत्यक्ष कलाकारांच्या सहवासाचे महत्त्व स्पष्ट केले. “अशा कार्यशाळा विद्यार्थ्यांची दृष्टी, कौशल्य आणि सर्जनशीलता अधिक सक्षम करतात,” असे ते म्हणाले. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी कलाकारांशी संवाद साधत पोर्ट्रेट प्रात्यक्षिके, समकालीन कला, डिझाइन ट्रेंड्स आणि करिअर संधींबाबत मार्गदर्शन मिळवले. पुढील दिवसांत सखोल प्रात्यक्षिके, चर्चासत्रे आणि प्रोजेक्ट-आधारित कामाद्वारे विद्यार्थ्यांना व्यावहारिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. विदर्भातील प्रतिष्ठित कला शिक्षण संस्था म्हणून महाविद्यालयात आधुनिक व पारंपरिक पद्धतींचा समन्वय साधला जातो. अशा सर्जनशील कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांना नामवंत कलाकारांशी संवादाची संधी मिळते, उद्योगातील बदलते ट्रेंड्स समजतात आणि त्यांच्या पोर्टफोलिओ व व्यावसायिक दृष्टिकोनाला बळ मिळते.
Powered By Sangraha 9.0