पैसे वाटणाऱ्या सात जणांवर पोलिसांची कारवाई

02 Dec 2025 20:00:25
भंडारा,
bhandara-news : सोमवारी नगरपालिका निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रत्येक उमेदवाराकडून प्रचाराचा वेग वाढला होता. दरम्यान मतदानाच्या आदल्या दिवशी प्रभागात पैसे वाटप करणाऱ्या काही जणांवर पोलिसांनी कारवाई केली. सोबतच आज 2 रोजी मतदानाच्या दिवशी देखील पोलिसांनी दोन अशा एकूण सात जणांवर कारवाई केली आहे. भंडारा नगरपालिकेच्या निवडणुकीत झालेल्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
 
 
bhandra
 
 
 
नगरपालिका निवडणुकीत पैशांचा महापूर येणार अशी चर्चा सुरुवातीपासूनच रंगली होती. दररोज मतदारांना मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन होत असल्याच्या चर्चाही सर्वत्र होत्याच. विविध प्रभागांमध्ये दररोज जेवणाच्या पार्टी, पैशांचे वाटप, भेट वस्तूंचे वाटप सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. काही उमेदवारांनी रात्री मतदानाच्या आदल्या रात्री मतदारांना पैसे वाटपाचे नियोजन केले होते. मात्र पोलिसांची यावर करडी नजर होती. या निवडणुकीत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी काटेकोर बंदोबस्त केला होता. दरम्यान काल आणि आज झालेल्या तीन कारवायांमुळे सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.
 
 
1 रोजी रात्री सिंधी कॉलनी परिसरात पैसे वाटप करणाऱ्या घनश्याम मोहनलाल शादीजा, जयराम प्रीतमदास शादीजा, जयंत विजय बलवानी, राजेश खानवानी सर्व रा. सिधी कॉलनी यांचेकडून १३,५०० रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर कृष्णा धोंडू ईश्वरकर रा. कोथरूणा, संदीप फाल्गुन वाढली रा. भिलेवाडा यांच्याकडून आज ४० हजार ४९९ रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. स्प्रिंगडेल शाळा परिसरात पैसे वाटप करताना ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. तसेच संताजी प्राथमिक शाळा लाला लजपत राय वॉर्ड परिसरात कमलेश दिगंबर तांडेकर याच्याजवळ १३,५०० रुपये रोख रक्कम सापडल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
 
 
पोलिसांनी केलेल्या तीन कारवायांमध्ये एकूण ६७ हजार ४९९ एवढी रक्कम जप्त करण्यात आली आहे. सर्व आरोपींवर भंडारा पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0