अन् बदलली मतमोजणीची तारीख

02 Dec 2025 20:30:48
वर्धा, 
date-of-counting-of-votes : वर्धेतील प्रभाग ९ ‘ब’ ची निवडणूक लांबणीवर गेल्यानंतर भाजपाचे उमेदवार प्रदीपसिंह ठाकूर यांनी २ डिसेंबरला झालेल्या मतदानाची व पुढे होणार्‍या मतदानाची मतमोजणी एकाच दिवशी घेण्यात यावी, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात १ डिसेंबर रोजी दाखल केली होती. त्याच्यासह इतरांच्या याचिकांवर नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. त्यानंतर मतमोजणीची तारीखच बदलण्यात आली आहे. आता ३ डिसेंबर ऐवजी २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
वर्धा शहराच्या प्रभाग ९ ‘ब’ मधून नगरसेवकपदासाठी भाजपाचे उमेदवार प्रदीपसिंह ठाकूर यांनी उमेदवारी दाखल केली.
 
 
 
kl
 
 
नामनिर्देशन अर्ज छाननीच्या दिवशी त्यांच्या विरोधात महेश तेलरांधे यांनी आक्षेप नोंदविला. निवडणूक निर्णय अधिकारी गणेश खताळे यांनी आक्षेप फेटाळत ठाकूर यांची उमेदवारी वैध ठरविली होती. त्यानंतर तेलरांधे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपिल केले. या ठिकाणी ही अपिल २२ नोव्हेंबरनंतरच न्यायालयाने खारिज केली. त्यानंतर न्यायालयांनी वेळीच अपिल निकाली काढली नसल्याचे कारण पुढे करीत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रभाग ९ ‘ब’ ची निवडणूक स्थगित करून पुढे ढकलण्यात आल्याचे पत्र प्रदीपसिंह ठाकूर यांना प्राप्त झाले. २ डिसेंबरला झालेल्या मतदानाची मतमोजणी ३ डिसेंबरला झाल्यास त्याचा परिणाम पुढे ढकलण्यात आलेल्या निवडणुकीवर व मतदारांवर होईल, हे कारण पुढे करीत ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात १ डिसेंबर रोजी याचिका दाखल केली. या विरोधात याचिका केंद्रस्थानी ठेवून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिकांकर्त्यांच्या याचिकांवर सहानुभुतीपूर्वक विचार करून निर्णय दिला. त्यानंतर ३ डिसेंबरला होणारी मतमोजणी रद्द करून मतमोजणीची तारीख आता २१ डिसेंबर निवडणूक आयोगाच्या वतीने निश्चित केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0