नागपूर,
dr manali kshirsagar शंभर वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर डॉ. मनाली मकरंद क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे पहिल्या महिला पूर्णवेळ कुलगुरू म्हणून त्यांची नोंद इतिहासात होणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूपदी राज्यपाल तथा कुलपती आचार्य देवव्रत यांनी सोमवार १ डिसेंबर २०२५ रोजी मुलाखत घेतल्यानंतर त्यांची निवड जाहीर केली. त्या विद्यापीठाच्या पहिल्या महिल्या पूर्णवेळ कुलगुरू ठरल्या आहेत. डॉ. मनाली क्षीरसागर यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयात संचालिका (तांत्रिक) व सल्लागार आहेत. पाच वर्षे किंवा वयाची पासष्ट वर्षे पूर्ण होतील, यापैकी जी तारीख अगोदर असेल त्या तारखेपर्यंत त्यांचा कार्यकाळ राहील.
दरम्यान, डॉ. सुभाष चौधरी यांच्या निधनानंतर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे व नंतर विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे चवरे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला होता. डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या रूपाने विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळाल्या आहेत. विद्यापीठाच्या त्या ४९ व्या पहिल्या महिला पूर्णवळ कुलगुरू राहणार आहेत. नागपुरातील दादासाहेब धनवटे नगर विद्यालयात १९८६ मध्ये दहावी केल्यानंतर दत्ता मेघे पॉलिटेक्निकमधून कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीत डिप्लोमा केला. यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी कॉलेजमधून १९९२ मध्ये पदवी घेतली. दत्ता मेघे व्यवस्थापन संस्थेतून २०१३ मध्ये फायनान्स व मार्केटिंगमध्ये पदव्युत्तर, अमरावती विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स व अभियांत्रिकी पदव्युत्तर, २००९ मध्ये अलाहाबाद कृषी संस्थेतून कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएच.डी. केली.
- जागतिक दर्जाचे मनुष्यबळ निर्माण करू
जागतिक पातळीवर टिकेल अशा स्वरूपाचे शिक्षण देण्याची आज गरज आहे. तीच गरज लक्षात घेता आम्ही त्यावर भर देणार आहोत, अशी भूमिका कुलगुरू डॉ. मनाली मकरंद क्षीरसागर यांनी तरुण भारतशी बोलताना मांडली. त्या म्हणाल्या, विकसित भारत २०४७ नुसार आम्ही विद्यापीठात काही चांगले बदल करणार आहोत.dr manali kshirsagar विद्यार्थी हिताला यात प्राधान्य राहील, शिवाय पारदर्शकता कायम ठेवत प्रत्येकाचा विद्यापीठावर विश्वास कायम राहावा असाही आमचा प्रयत्न राहील असेही डॉ. मनाली क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. बुधवार ३ डिसेंबर रोजी आपण कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.