नागपूर,
green-fireworks : सीएसआयआर–राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी), नागपूर येथे ग्रीन फटाक्यांसाठी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र तर करैकुडीतील सीएसआयआर - सीईसीआरआय येथे उत्कृष्टता केंद्र यांचे उद्घाटन सीएसआयआरच्या महानिदेशक व डीएसआयआरच्या सचिव डॉ. एन. कलैसेल्वी यांच्या हस्ते व्हर्च्युअली पार पडले. सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि किफायतशीर फटाके विकसित करण्याच्या दृष्टीने ही मोठी पाऊल ठरली आहे. या कार्यक्रमाला सीएसआयआर-नीरी आणि डीएसआयआर- सीईसीआरआयचे संचालक, वैज्ञानिक तसेच फटाके उत्पादक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संवादादरम्यान डॉ. कलैसेल्वी यांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयाने ग्रीन फटाक्यांचे प्रमाणन सीएसएआर-नीरी कडून अनिवार्य केले असल्याने या उत्कृष्टता केंद्रांची स्थापना अत्यंत महत्त्वाची ठरते. पुढील वर्षी किमान सहा नवे ग्रीन फटाके विकसित करावेत तसेच एआय/एमएल तंत्रज्ञानाचा वापर करून प्रोग्रामेबल फटाके तयार करावेत. असे त्या म्हणाल्या.

सीएआयआर-नीरीचे संचालक डॉ. एस. वेंकट मोहन यांनी फटाके उत्पादकांना दिलेल्या वैज्ञानिक मार्गदर्शनाची माहिती दिली आणि हब-एंड-स्पोक मॉडेलद्वारे उद्योगाशी अधिक मजबूत सहयोग साधला जाईल, असे सांगितले. सीएसआयआर-सीईसीआरआयचे संचालक डॉ. के. रमेशा यांनी या संयुक्त उपक्रमामुळे संशोधन, तंत्रज्ञान आणि समाजाला व्यापक लाभ होईल असे नमूद केले. कार्यक्रमात एनसीओई-जीएफ आणि सीओई-जीएफसाठी मानक कार्यपद्धती प्रकाशित करण्यात आली. सीएसआयआर-नीरीचे मुख्य वैज्ञानिक डॉ. आर. जे. कृपादम यांनी ग्रीन फटाक्यांच्या मूलभूत फॉर्म्युलेशन्सपासून आजवरच्या प्रवासाचा आढावा सादर केला. या उत्कृष्टता केंद्रांमुळे पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित ग्रीन फटाक्यांच्या विकासाला देशात नवी दिशा मिळणार आहे.