अमरावती रेल्वे स्थानक हलविण्याला विरोध

02 Dec 2025 21:14:02
अमरावती, 
amravati-railway-station : येथील मॉडेल रेल्वे स्थानक आहे त्या जागेवरून राजापेठ पोलिस ठाण्याच्या मागे हलविण्याच्या प्रस्तावाला काँग्रेसचा तीव्र विरोध आहे. विद्यमान रेल्वे स्थानकाची जागा भूमाफियांच्या घशात टाकण्याचा हा डाव असल्याचा आरोप काँग्रेसने आज पत्रकार परिषदेतून केला.
 
 
amt
 
शहराचे वैभव असलेले ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानक बंद पाडण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी सुरू केलेले कट कारस्थान निंदनीय आहे. रेल्वे स्थानक हटवून त्या जागेवर आधुनिक मॉल व इतर सोयी उभारण्याच्या नावाखाली भूमाफियांना हस्तांतरित करण्याचे पड्यंत्र भाजपा व महायुतीच्या लोकप्रतिनिधींनी रचले आहे. या षड्यंत्राचा भाग म्हणून खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी या प्रस्तावाला उघडपणे मान्यता दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत अमरावती रेल्वे स्थानकाला काँग्रेस हात लावू देणार नाही, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. शहराच्या विकासाची रेल्वे स्थानकाच्या आगमनाने झाली. शहराच्या परकोटाच्या बाहेर खर्‍या अर्थाने विकासाचे नवे पर्व तेव्हापासून सुरू झाले होते व शहर अत्यंत गतीने भरभराटीकडे गेले होते.
 
 
रेल्वे स्थानक असणे हे कोणत्याही शहरासाठी समृद्धी आणि संपन्नता आणणारी महत्त्वपूर्ण बाब असते. अनेक प्रयत्न आणि संघर्षानंतर मिळालेले हे स्थानक उध्वस्त करून त्या जागेला भूमाफियांच्या घशात घालण्याचा जो लपून-छपून प्रयत्न गेल्या चार महिन्यांपासून महायुतीच्या नेत्यांनी सुरू केला होता त्याचा भांडाफोड आता झाला आहे. या कटाचा मुख्य भाग म्हणजे रेल्वे पुलाचे खासगी स्ट्रक्चरल ऑडिट करणे, तो पुल वाहतुकीसाठी अचानक बंद करणे आणि त्याची दुरुस्ती करण्यासाठी कोणतीही हालचाल न करणे ही बाब आता उघड झाली आहे. या सार्‍या हालचालींचा अंतिम उद्देश रेल्वे स्थानक बंद पाडणे हाच आहे, असा आरोप करून काँग्रेसने हे षडयंत्र हाणून पाडण्याचा निर्धार केल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर मिलिंद चिमोटे, समीर जवंजाळ, वैभव देशमुख यांच्यासह अन्य उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0