४ डिसेंबरच्या पौर्णिमेला दिसणार ‘सूपरमून’

02 Dec 2025 21:11:11
अमरावती, 
supermoon : ४ डिसेंबर रोजी पौर्णिमेच्या दिवशी सुपरमून दिसणार आहे. या दिवशी पृथ्वीपासून चंद्राचे अंतर कमी राहील. त्यामुळे चंद्र या दिवशी मोठा व प्रकाशमान दिसेल. सरासरी पृथ्वी-चंद्र हे अंतर ३ लाख ८५ हजार कि.मी. असते. जेव्हा पृथ्वी-चंद्र हे अंतर ३ लाख ७० हजार कि. मी. च्या आत असते त्याला सुपरमून असे म्हणतात.
 

amt 
 
चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने समुद्राच्या भरती-ओहोटीची तीव्रता वाढणे, वादळ यासारख्या घटना घडू शकतात. पृथ्वीवरून आपणास नेहमी चंद्राचा ५९ टक्क भाग पाहता येतो. चंद्रावरून पृथ्वी ही ९८.४% दिसू शकते. चंद्रावरून पृथ्वीवर प्रकाशकिरण येण्यास १.३ सेकंद लागतात. चंद्राचे वय हे ४.६५ अब्ज वर्ष आहे. चंद्र हा पृथ्वीपासून दरवर्षाला ३.८ सेंटीमीटर लांब जात आहे. त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी होईल व १०० वर्षांनी दिवस हा २ मिली सेकंदने मोठा होईल. चंद्रावर ३० हजार विवरे व १२ पर्वत आहेत. पर्वत व विवरे दुर्बिणीमधून अगदी चांगल्या प्रकारे पाहता येतात. ४ डिसेंबरला संध्याकाळी दिसणारा सूपरमून खगोलप्रेमींनी व जिज्ञासूंनी अवश्य बघावा. हा सूपरमून अगदी साध्या डोळ्यांनी पाहता येईल, अशी माहिती मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय म. गिरुळकर यांनी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0