वेध...
नितीन शिरसाट
terror of leopards राज्यातील अनेक जिल्ह्यांत सध्या बिबट्यांनी दहशत माजवली आहे. अनेक ठिकाणी मानवी वस्तीत बिबट्यांचा मुक्तसंचार दिसून येतो आहे. काही ठिकाणी तर लहानग्या मुलांवर बिबट्याने हल्ला केल्याच्याही घटना घडल्या आहेत. पण सुदैवाने या घटनेत लहान मुले वाचली असली तरी इजा मात्र गंभीर झाल्या आहेत. या घटनेने सध्या नगर पालिका निवडणुकांच्या धामधुमीत राजकीय वातावरण तापलेले असताना संपूर्ण महाराष्ट्रभर बिबट्यांची दहशत पसरली आहे. अशा परिस्थितीत बिबट्यापासून वाचवण्यासाठी वनविभागाने नागरिकांसाठी काही आदेश व उपाय जारी केले आहेत. बिबट्यांच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यावर उपाय म्हणून, अनेक ठिकाणी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून गस्त वाढवण्यात आली आहे. ज्यात थर्मल ड्रोनसारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. नागरिकांनीही स्वसंरक्षणासाठी उपाययोजना केल्या आहेत. जसे की पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात महिलांनी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालणे. प्रशासनाकडे बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावण्याची आणि गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.
नागरिक आणि वन विभागाचे कर्मचारी मिळून गस्त घालत आहेत. बिबट्याच्या हल्ल्यांमुळे होणाèया नुकसानीची भरपाई आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्रात बिबटग्रस्त भागात राज्य आपत्ती जाहीर करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. वनअधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. जंगलातील वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळू लागले आहेत. वन्यप्राण्यांमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. तसेच प्राणघातक हल्ले करत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने यावर ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा-मेहकर मार्गावर लमानदेव मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या शेतात बिबट्याचा मुक्तसंचार असल्याचे समजते. तिथे खेळत असलेल्या लहान मुलांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार निदर्शनास आला व मोठा अनर्थ टळला. पाच दिवसांपासून संग्रामपूर तालुक्यातील पाच गावांत बिबट्याने दहशत माजविली आहे. काकनवाडा, वडगाववाण, खळद, कोलद, बल्लाळी या गावांत आपला डेरा टाकल्याने या भागातील शेतातील कामे प्रभावित झाली आहेत. गेल्या पाच दिवसांपासून शेतमजूर व शेतकèयांनी शेताकडे जाण्यास पाठ फिरवली आहे. या पाच गावांना लागून वान नदी व अडचणीचे जंगल अशी बिबट्याला लपण्यासाठी जागा आहे.terror of leopards पुणे जिल्ह्यातील बिबटप्रवण क्षेत्रातील शाळांची वेळ सकाळी 9.30 ते दुपारी 4 अशी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि अंधार होण्यापूर्वी त्यांना घरी पोहोचता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात तीन लोकांना प्राण गमवावे लागले. या पृष्ठभूमीवर, शिरूर- आंबेगाव- खेड-जुन्नर या अतिसंवेदनशील बिबटप्रवण क्षेत्रातील शाळांच्या वेळात बदल करण्यात आला. गेल्या काही महिन्यांत गावोगावी दिसणाऱ्या बिबट्यांची दहशत हा लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न बनला आहे. याच पृष्ठभूमीवर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाची महत्त्वाची आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीत वन विभागाच्या संरचनात्मक विस्तारीकरण तसेच कार्यात्मक सबलीकरणासंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला. थर्मल ड्रोन, ट्रॅप कॅमेरे, झूम स्कोप यांच्या मदतीने तसेच पथकांनी विविध भागांत बिबट्यांचा शोध सुरू केला आहे. तसेच वन विभागामार्फत शहरातील विशेषत: टेकडी परिसर व इतर मोठ्या प्रमाणात संरक्षित प्रदेशातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. बिबट्याच्या मुक्तसंचाराने परिस्थिती गंभीर झाली असून मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी शासन, प्रशासन आणि नागरिक दोन्ही स्तरांवर प्रयत्न करणे आवश्यक आहे.
9881717828