केल्याने तीर्थाटन

02 Dec 2025 05:00:00
अग्रलेख... 
 
tourism is traditional भौतिक समाधानासाठी आवश्यक असलेल्या गरजांची पूर्तता झाली की, आपण ज्या समाधानाच्या शोधात होतो ते समाधान हे नाही याची जाणीव कदाचित होत असावी. बहुधा, भौतिक सुखाच्या आणि समाधानाच्या आजपर्यंतच्या कल्पनांचा पूर्ण उपभोग घेऊनही सुखाचा आणि समाधानाचा तो शोध संपलेला नसावा. तसे नसते, तर पर्यटनाच्या पारंपरिक प्रथांमध्ये परिवर्तन होऊ लागले नसते. ‘केल्याने देशाटन’ हा पर्यटनाचा पारंपरिक बाज आपल्या देशात तसा जुनाच आहे. या पर्यटनाच्या कल्पना मात्र जुन्या काळात वेगळ्या होत्या. अशा पर्यटनातून वेगवेगळ्या प्रांतातील पंडित, विद्वानांचा सहवास मिळतो, व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो आणि व्यासंग वाढून विद्वत्ता समृद्ध होते ही पारंपरिक पर्यटनाची समजूत काळासोबत बदलत गेली आणि पर्यटनास सहलीचे स्वरूप प्राप्त होत गेले. प्रेक्षणीय स्थळांच्या सहली आणि त्या निमित्ताने होणारा बाजारहाट व त्यातून पुन्हा घरांचे स्वरूप समृद्ध करणाऱ्या वस्तूंची खरेदी असा पर्यटनाचा नवा बाज सुरू झाल्याने त्यास या क्षेत्रास उद्योगाचे स्वरूप प्राप्त होत गेले.
 
 
 

पर्यटन  
 
 
एका अर्थाने, पर्यटन हा आर्थिक उन्नतीचा एक नवा पर्याय म्हणून उभारी घेत गेला असला, तरी सहली, मौजमजा आणि आर्थिक उलाढालीचा नवा मार्ग असेच त्याचे रूप राहिल्याने जुन्या काळातील पर्यटनाच्या किंवा देशाटनामागच्या कल्पना संकोतच गेल्या. पुढे पर्यटनाच्या नव्या कल्पनांस बळ देतील अशी नवी पर्यटनस्थळे नव्याने आकार घेऊ लागली, जुन्या, पठडीबाज पर्यटनस्थळांनी कात टाकली व नव्या जाणिवांसोबत जुळवून घेण्याचे प्रयत्न करून त्यानुसार स्वत:मध्ये तसे बदलही घडवून आणले. पर्यटनाचा उद्देशच जेव्हा बदलून जातो, तेव्हा त्यामागील व्यवहारदेखील बदलतात. नव्या व्यवहारांनुसार पर्यटनाच्या संकल्पनेत आर्थिक हितसंबंधांना प्राधान्य मिळाल्याने साहजिकच भौतिक सुखाच्या आणि विरंगुळ्याच्या शोधाचा नवा मार्ग म्हणूनच पर्यटन व्यवसायाची बरकत सुरू झाली. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असे म्हणतात. ते खरे आहे हे वारंवार सिद्धही झालेले आहे. अन्यथा, वेशभूषेपासून केशभूषेपर्यंतच्या अनेक परंपरा वेगळ्या स्वरूपात फॅशनच्या नावाने नव्या पिढीत रुजल्या नसत्या. पर्यटनाच्या नव्या व्यावहारिक विरंगुळ्यातून सुख, समाधानाचे शोध संपत नाहीत, विरंगुळ्याचे क्षणही वेचता येत नाहीत असे आता अनेकांच्या लक्षात येऊ लागले आहे.
आता या क्षेत्राला नव्या वळणाची वाट सापडली असावी, पर्यटनक्षेत्राचे पूर्वीचे देशाटनाचे रूप बदलून सहली किंवा विरंगुळ्याचा मार्ग म्हणून वळण घेतलेल्या या क्षेत्राने पुन्हा जुन्या वाटांकडे मोहरा वळविण्याचे ठरविले असावे. त्याची काही चिन्हे आता दिसू लागली आहेत. समाजाची संस्कृती पिढीगणिक बदलत असते असे म्हटले जाते. नव्या पिढीसोबत रुजणाऱ्या नव्या संस्कृतीमुळे जुन्या पिढ्या उसासे टाकतात, ‘आमच्या वेळी असे नव्हते’ असे म्हणत बदलत्या संस्कृतीच्या नावाने खंतदेखील व्यक्त करत असतात, त्या पिढीला दिलासा मिळेल असे नवे चित्र पर्यटनाच्या क्षेत्रात उमटू लागल्याचे काही संकेत आता मिळू लागले आहेत. सहलींच्या किंवा प्रेक्षणीय स्थळांची जागा आता पुन्हा तीर्थक्षेत्रे घेऊ लागल्याचे चित्र नव्याने समोर येऊ लागले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यटन क्षेत्राच्या भावी वळणाची ही नवी दिशा कदाचित याआधीच दिसू लागली असावी. राजे महाराजांच्या सामर्थ्यामुळे नव्हे, तर या देशातील तीर्थक्षेत्रांच्या वाटेवर उमटलेल्या संत-महंतांच्या पाऊलखुणांमुळे भारतासारखा खंडप्राय देश सांस्कृतिकदृष्ट्या एकसंध राहिला आहे, यावर विदेशी अभ्यासकांचेही एकमत आहे. भक्तीच्या धाग्याने व धार्मिकतेच्या भावनेने शाश्वत जीवनाच्या अर्थांचा शोध घेण्याचा ध्यास ही भारताची सांस्कृतिक परंपरा राहिली आहे आणि त्या ध्यासाच्या धाग्यानेच जनतेस प्रांतभेद, भाषाभेदाच्या दऱ्या बुजवून एकत्र राखले आहे. त्यामुळेच हा देश परकीय आक्रमकांच्या विध्वंसालाही पुरून उरला आणि देशाने आपली परंपरा जतन केली. संस्कृतीच्या या उपकारांची जाणीव पुन्हा समाजात जागी करण्याच्या हेतूने मोदी सरकारने विकासासोबत परंपरांच्या पुनरुज्जीवनाची मोहीम हातात घेतली आणि तार्थक्षेत्रांच्या विकासाचा कार्यक्रम सुरू केला. अयोध्येतील राम मंदिर, काशी विश्वेश्वराच्या नवनिर्माणाचा कार्यक्रम, गुजरातमधील सरदार पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी, अशा काही स्थळांच्या विकासातून पर्यटनक्षेत्रातील बदलाच्या नव्या वाटा निर्माण होत गेल्या. काशी विश्वेश्वराच्या कायापालटामुळे, केवळ तीर्थक्षेत्र असलेले हे ठिकाण आता पर्यटनक्षेत्रही ठरले आहे.tourism is traditional सुधारलेले रस्ते, नियोजनबद्ध विकास यामुळे भाविकांच्या भक्तिभावना जाग्या होतात, तसेच प्रेक्षणीय काही पाहिल्याचा नवा आनंदही त्यासोबतच मिळू लागला आहे. केदारनाथ धामच्या विकासाची योजनाही पर्यटनाच्या नव्या वाटांना विस्तृत करण्यास साह्यभूत ठरणार आहे. विकास आणि संस्कृती संवर्धनाचे हे नवे प्रयोग हातात हात घालून सुरू असल्याने पर्यटनक्षेत्राच्या पठडीबाजपणाने कात टाकण्यास सुरुवात केली असून पर्यटनाची जागा तीर्थाटनाने घेतली तर नवल वाटू नये असा आश्चर्यकारक बदल दिसू लागला आहे.
भारतातील पर्यटनक्षेत्राचा हा बदलता बाज देशातील पर्यटकांप्रमाणे विदेशी पर्यटकांसही भुरळ घालू लागला आहे. गेल्या काही वर्षांत भारतात पर्यटनासाठी येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत आहेच, पण त्यांनादेखील पर्यटनसंस्कृतीतील हा नवा बदल खुणावत आहे. भारतातील प्रेक्षणीय स्थळांच्या त्यांच्या पसंतिक्रमात विविध धार्मिक स्थळे, तीर्थक्षेत्रे आणि अयोध्येतील राम मंदिरासारख्या नव्या यादीचीही भर पडली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत, विशेषतः कोविड महामारीनंतर जनजीवन पूर्वपदावर आल्यापासूनच्या काळात भारतास तब्बल सुमारे एक कोटी विदेशी पर्यटकांनी भेट दिली. यापैकी बहुसंख्य पर्यटकांची पावले भारतीय संस्कृतीची मानचिन्हे असलेल्या तीर्थक्षेत्रांकडेही वळलेली दिसतात. हा पर्यटनसंस्कृतीतील बदल किती चांगला, हे ठरविण्यासाठीचे नवे मापदंड याचे उत्तर सकारात्मकच देतात. पर्यटन हा उद्योग असेल, तर त्यातून आर्थिक उलाढालींचे नवे स्रोत तयार व्हावेत हीच प्राधान्याने अपेक्षा असते. समाजात रोजगाराच्या नव्या संधी, उत्पन्नाचे नवे स्रोत आणि पर्यायाने जीवनशैलीत होणारी सुधारणा हेच विकासाचे उद्दिष्ट असेल, तर तीर्थाटनांच्या नव्या प्रकारांतूनही ते साध्य झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दर वर्षी 31 डिसेंबर हा दिवस वर्षअखेरचा सोहळा म्हणून साजरा केला जातो. त्याच्या साजरेपणाच्या कल्पनांवरील बाह्य समजुतींचा पगडादेखील आता नव्या पर्यटनसंस्कृतीमुळे पुसला जात असल्याचे चित्र आहे. सणासुदीच्या काळातील पर्यटनाकडे वळणारी पावले आणि वर्षअखेरीसारख्या क्षणांचे साजरेपण यांमधील फरक आता पुसला जाऊ लागला आहे. उत्सवांचा काळ संपला की समाजाची पावले मौजमजेकडे वळतात हा आजवरचा पर्यटनक्षेत्राचा पठडीबाज अनुभवही आता बदलाच्या टप्प्यावर दाखल झाला आहे. कारण, आता भारतीय पर्यटकांची पावले वर्षअखेरीचा सोहळा साजरा करण्यासाठी किंवा ख्रिसमसची सुटी घालविण्यासाठी युरोप किंवा थायलंडसारख्या प्रेक्षणीय परदेशी पर्यटनांची वाट धरण्याऐवजी भारतातील तीर्थक्षेत्रांच्या सहलीकडे वळू लागली आहेत. अयोध्या, वाराणसी, ऋषीकेश, अमृतसरसारख्या तीर्थस्थळांवरील गर्दी यंदाच्या डिसेंबरचा अखेरच्या आठवड्यात नवा विक्रम प्रस्थापित करेल असा सहल आयोजकांचा अंदाज या बदलाचे संकेत देतो. गेल्या वर्षभरात जेन-झीच्या मानसिकतेचे अनेक नवे पैलू जगाच्या वेगवेगळ्या भागांतून दिसू लागले असताना, भारतातील ‘जेन-झी’ला तीर्थस्थळांचे आकर्षण वाटू लागल्याचेही दिसू लागले आहे.tourism is traditional तीर्थस्थळांची यात्रा करणाऱ्यांपैकी सुमारे 12 टक्के पर्यटक तरुण पिढीतील असल्याची ढोबळ आकडेवारी समोर येत आहे. गेल्या वर्षातील तीर्थयात्रींच्या तुलनेत ही टक्केवारी सुमारे 15 टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे, भौतिक सुखाच्या उपभोगानंतरही समाधानाचा शोध संपलेला नसल्याचा व समाधानाच्या शोधात नव्या समाजाच्या आसुसलेपणाचा अंदाज या नव्या बदलातून येऊ शकतो. पर्यटनक्षेत्राला चालना मिळेल हा या नव्या बदलाचा फायदा आहेच, पण नव्या मानसिकतेचे दर्शन घडविणारा हा नवा बदल म्हणजे भविष्यात घडणाऱ्या इतिहासाच्या पुनरावृत्तीची चाहूल तर नसेल?
Powered By Sangraha 9.0