गडचांदुरात मतदाराने फोडले ईव्हीएम यंत्र!

02 Dec 2025 20:06:05
गडचांदूर, 
voter-breaks-evm-machine : चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मंगळवार, 2 डिसेंबर रोजी सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान प्रभाग 9 मधील आदर्श हिंदी विद्यालय (केंद्र क्रमांक 2) येथे मोठा गोंधळ उडाला. राम मल्लेश दुर्गे (40) या मतदाराने मतदान प्रक्रियेदरम्यान ‘नगारा’चे बटन दाबल्यानंतर अचानक भाजपच्या ‘कमळ’ चिन्हाचा दिवा लागल्याचा आरोप करीत संतापाच्या भरात ईव्हीएम यंत्रच जमिनीवर आदळत फोडून टाकले!
 
 
 
kl
 
 
 
सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांवर झालेल्या या धक्कादायक घटनेची माहिती पसरताच मतदान केंद्राबाहेर मतदारांनी एकच गर्दी केली होती. संतप्त नागरिकांनी मुर्दाबादचे जोरदार नारे द्यायला सुरूवात केली. त्यामुळे काही वेळासाठी तणाव निर्माण होऊन मतदान प्रक्रिया खोळंबली. उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र जाधव, मुख्याधिकारी आशिष चव्हाण आणि ठाणेदार शिवाजी कदम यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नागरिकांना शांत करण्यासाठी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी ईव्हीएमची पंचनामा प्रक्रिया सुरू केली असून, पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे गडचांदुरातील प्रभाग 9 च्या मतदान केंद्राबाहेर सायंकाळी साडेसातपर्यंत तणावाचे वातावरण असून, सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0