नेतान्याहू यांनी का टाळला भारत दौरा?

02 Dec 2025 09:41:53
 
विश्वभ्रमण. . 
 
प्रा. जयसिंग यादव
netanyahu इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने इस्रायलचे भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले संबंध खूप मजबूत आहेत, असे अलिकडे सांगितले. खरे तर याची उजळणी करण्याची काहीच गरज नव्हती; परंतु नेतान्याहू यांच्या कार्यालयाने ‘एक्स’वर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांची टीम भारतभेटीसाठी नव्या तारखेबाबत चर्चा करीत आहे. याचा अर्थ असा की, नेतान्याहू यांचा आगामी भारत दौरा पुढे ढकलला गेला आहे आणि नवी तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. याचा दुसरा अर्थ असा की, मध्य पूर्वेत घेतलेल्या भूमिकेमुळे नेतान्याहू अनेकांच्या रडारवर आहेत आणि जीविताला धोका असल्याच्या भीतीतून तूर्त त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. दुसरे एक कारण म्हणजे इस्रायलचे परपंरागत विरोधी असलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन हेही नेमके याच काळात भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. ‘आय 24 न्यूज’ या इस्रायली वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार नेतान्याहू यांनी सुरक्षेच्या कारणास्तव भारत दौरा रद्द केला आहे. तथापि, ‘सुरक्षेच्या कारणास्तव’ असा उल्लेख कुठेही अधिकृतपणे करण्यात आलेला नाही. या वृत्तवाहिनीचे राजनयिक प्रतिनिधी गाय अझ्रिएल यांनी लिहिले आहे की, नेतान्याहू यांची भारतभेट सुरक्षेच्या कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे.
 
 

नेत्यानाहू  
 
 
दोन आठवड्यांपूर्वी नवी दिल्ली येथे एका दशकाहून अधिक काळानंतर अत्यंत शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. त्यात 13 लोक ठार झाले तर डझनभर जखमी झाले होते. नेतान्याहू यांनी 2018 मध्ये शेवटचा भारत दौरा केला होता आणि पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी ते परत येणार होते. आता सुरक्षेच्या मूल्यांकनाच्या आधारे, पुढील वर्षी नवीन तारीख निश्चित होण्याची अपेक्षा आहे.
नेतान्याहू हे मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प या दोघांनाही आपले मित्र म्हणतात. वृत्तवाहिनीच्या या अहवालाचा हवाला देऊन, भारतीय माध्यमांमध्ये बातम्या पसरू लागल्या की, इस्रायली पंतप्रधानांनी सुरक्षेच्या कारणास्तव आपला भारत दौरा पुढे ढकलला आहे. संध्याकाळपर्यंत इस्रायली पंतप्रधान कार्यालयाला स्पष्टीकरण द्यावे लागले. इस्रायली पंतप्रधान कार्यालयाच्या विधानाबाबत, गाय अझ्रिएल यांनी लिहिले की, सुरक्षेच्या कारणास्तव डिसेंबरमध्ये पंतप्रधान नेतान्याहू यांचा भारत दौरा पुढे ढकलण्यात आला आहे, या आमच्या विशेष वृत्तानंतर पंतप्रधान कार्यालयाने एक असामान्य निवेदन जारी केले आहे. हे विधान दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्यावर आणि भेटीसाठी नवी तारीख निश्चित करण्यावर भर देते. भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी 20 नोव्हेंबर रोजी इस्रायलमध्ये नेतान्याहू यांची भेट घेतली. या बैठकीनंतर, इस्रायली पंतप्रधानांनी 23 नोव्हेंबर रोजी ‘एक्स’वर लिहिले की, आज मी गोयल यांची भेट घेतली. भारत आणि इस्रायल आपली धोरणात्मक भागीदारी मजबूत करीत आहेत. नेतान्याहू यांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचा भारत दौरा पुढे ढकलला का, या प्रश्नाचे उत्तर देताना सौदी अरेबियातील भारताचे माजी राजदूत तलमीज अहम म्हणतात, नेतान्याहू यांनी सुरक्षेच्या कारणास्तव दौरा पुढे ढकलणे भारतासाठी लज्जास्पद आहे. इस्रायली पंतप्रधानांनी आपला भारतातील सुरक्षेवर पूर्ण विश्वास आहे, असे स्पष्ट केले असले, तरी नेतान्याहू सरकारकडून ब्रीफिंगशिवाय तिथल्या माध्यमांमध्ये इतका मोठा मुद्दा प्रकाशित झाला नसता.
आजघडीला नेतान्याहू हे घरी अनेक आघाड्यांवर वेढलेले आहेत आणि या वेळी भारताला भेट देणे त्यांच्यासाठी कठीण आहे. त्यांनी सत्य सांगायला हवे होते; परंतु कथित भेट पुढे ढकलण्याचे कारण म्हणून त्यांनी सुरक्षाविषयक चिंता पुढे केल्या आहेत. हे भारताचा अपमान करणारे आहे. भारत आणि इस्रायलमध्ये बरेच प्रतीकात्मक संबंध आहेत. असे असूनही, नेतान्याहू यांनी आपला दौरा पुढे ढकलून भारताला चांगला संदेश दिलेला नाही. अमेरिकेशिवाय कोणीही त्यांच्यासोबत उभे नव्हते, तेव्हा भारत त्यांना पाठिंबा देत होता. ट्रम्प यांच्या भारताप्रति बदललेल्या भूमिकेवरून इस्रायलमध्ये वाद सुरू झाला आहे. नेतान्याहू यांनी भारताचा दौरा पुढे ढकलण्याचे कारण म्हणून सुरक्षा चिंतांचा उल्लेख करणे तर्कसंगत नाही. नेतान्याहू भारताकडून खूप अपेक्षा करत आहेत, पण भारत एका मर्यादेपलीकडे जाऊ शकत नाही. नेतान्याहू यांना वाटते की, भारत कधी तरी पॅलेस्टिनींची बाजू घेतो तर कधी तरी इस्रायलला पाठिंबा देतो. भारताने या विषयात मध्यस्थी करावी, असे इस्रायलला वाटत असले, तरी भारत तसे करणार नाही. कारण त्याच्याही काही मर्यादा आहेत. त्यातच सध्या भारत आणि अमेरिकेचे संबंध चांगले नसल्याने ट्रम्प भारताची मध्यस्थी मान्य करणार नाहीत. याची भारताला जाणीव आहे. भारताला हे माहिती आहे की, कोणीही मध्यस्थी केली तरी ट्रम्प स्वतःच्या हितांशिवाय सहज काहीही घडू देणार नाहीत.
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला, तर इस्रायलची प्रासंगिकता वाढते. कारण इस्रायल पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना धोका मानतो. भारताचे अमेरिकेशी संबंध खराब असतील, तर इस्रायलशीही फारसे चांगले संबंध राहणार नाहीत. ट्रम्प यांनी भारतावरील कर 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली, तेव्हा नेतान्याहू म्हणाले होते की, मोदी आणि ट्रम्प हे चांगले मित्र आहेत. ते मोदी यांना ट्रम्प यांच्याशी व्यवहार करण्यासाठी काही सूचना देतील; परंतु सार्वजनिकरीत्या नाही. नेतान्याहू यांनी भारतीय पत्रकारांच्या गटाला सांगितले की, भारत आणि अमेरिकादरम्यानच्या संबंधांमध्ये मूलभूत समजूतदारपणा आहे. दोन्ही देशांमधील संबंधांचा पाया खूप मजबूत आहे. दोन्ही देशांनी करार केला आणि करसमस्येचे निराकरण केले तर ते भारत आणि अमेरिकेच्या हिताचे असेल. हे आमच्यादेखील हिताचे असेल; कारण दोन्ही देश चांगले मित्र आहेत. नेतान्याहू यांनी या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेला भेट दिली होती. ‘व्हाईट हाऊस’च्या एका सल्लागाराने युक्रेनवरील रशियाच्या क्रूर हल्ल्याला ‘मोदी युद्ध’ म्हटले आहे. ऊर्जेसाठी भारताचे रशियावर वाढत असलेले अवलंबित्व दुःखद आहे; परंतु पुतिन यांच्या युद्ध गुन्ह्यांसाठी भारत जबाबदार नाही, असेही त्यांनी म्हटले होते.netanyahu माजी इस्रायली खासदार आणि मध्य पूर्व प्रकरणांच्या तज्ज्ञ केसेनिया स्वेतलोवा यांनी या वर्षी फेब्रुवारीमध्ये मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीपूर्वी ‘जेरुसलेम पोस्ट’ या वृत्तपत्रामध्ये ‘इस्रायलने मोदी-ट्रम्प बैठकीची काळजी का घ्यावी’ या शीर्षकाचा लेख लिहिला होता.
केसेनिया स्वेतलोवा यांनी लिहिले की, भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर (आयएमईसी) साठी भारत आणि अमेरिकेतील चांगले संबंध महत्त्वाचे आहेत. मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारताचे इस्रायलशी संबंध चांगले झाले आहेत. मोदी हे इस्रायलला भेट देणारे पहिले पंतप्रधान होते. भारत-पाकिस्तान संघर्षात जगातील जवळजवळ सर्व देशांनी तटस्थ राहण्याचा प्रयत्न केला, तेव्हा इस्रायलने भारताला उघडपणे पाठिंबा दिला. 2003 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात इस्रायली पंतप्रधानांची पहिली भारतभेट झाली होती. त्या वेळी एरियल शेरोन यांनी भारताला भेट दिली होती. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला की भारत आणि इस्रायलमधील संबंध अधिक मजबूत होतात, असे निरीक्षण अनेक विचारवंतांनी नोंदवले आहे. पाकिस्तानकडे असलेली अण्वस्त्रे आणि अणुबॉम्ब मुस्लिम राष्ट्रांचा विरोधक म्हणून पाकिस्तान इस्रायलविरोधात वापरायला कमी करणार नाही, अशी भीती इस्रायलला वाटते. त्यामुळे या दोन देशांमध्ये तणाव होतो, तेव्हा इस्रायल-भारत संबंधांमध्ये सुधारणा होते. सध्या भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे संबंध ताणलेले आहेत. अशा वेळी नेतान्याहू यांनी दौरा रद्द करायला नको होता; परंतु ट्रम्प यांच्या दबावाखाली कदाचित नेतान्याहू यांनी हा दौरा रद्द केला असावा.
(लेखक राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत.)
Powered By Sangraha 9.0