अमरावतीत टोळक्याने घातला धुमाकूळ

20 Dec 2025 20:27:15
अमरावती,
amravati-news : नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी मंथन पाळनकर या तरुणाच्या खुनामुळे संतप्त झालेल्या २० ते २५ जणांच्या टोळक्याने शुक्रवारी रात्रीच्या सुमारास शहरातील शंकरनगर व केडियानगरात चांगलाच धुमाकुळ घातला. यावेळी काही कारसह त्यांनी काही दुचाकींची तोडफोड केली. या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी टोळक्यातील २० ते २५ जणांविरुध्द गंभीर गुन्हे दाखल करुन शनिवारी पहाटेपर्यंत १७ जणांना ताब्यात घेतले. त्यापैकी सहा अल्पवयीन आहेत. उर्वरित अकरा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
 
 
AMT
 
मंथनचा खुन झाल्यानंतर त्याच्या खुनाची प्रतिक्रीया म्हणून २० ते २५ जणांनी अचानक दहशत पसरवून परिसरातले दिसेल ते वाहन फोडणे, सर्वसामान्यांना काठी दाखवणे, शस्त्राचा धाक दाखवने असा आक्रमक पवित्रा घेतला. अचानक घडत असलेल्या या प्रकाराने नागरीक चांगलेच घाबरले. आमदार रवि राणा व त्यांचे कार्यकर्तेही घटना माहित होताच पोहोचले. ही माहीती राजापेठ पोलिसांना मिळताच ठाणेदार पुनीत कुलट यांच्यासह हवालदार मनीष करपे व त्यांच्या पथकाने शुक्रवारी रात्रभर शहराच्या विविध भागांत दडून बसलेल्या या टवाळखोरांची युध्द पातळीवर शोधमोहीम राबवली. शनिवारी पहाटेपर्यंत पोलिसांनी एकूण १७ जण ताब्यात घेतले. दरम्यान सर्व आरोपींना ठाण्यात आणल्यानंतर शुक्रवारी उशिरा रात्री पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी राजापेठ पोलिस ठाणे गाठून त्या टवाळखोरांना योग्य पध्दतीने समज दिली.
 
 
११ आरोपींना शनिवारी न्यायालया समक्ष हजर करण्यात आले. त्यात अभिषेक हेमराज सूर्यवंशी, ओम दिप बावरी, अजय चंद्रभान मोहोड, विशाल विश्वनाथ गोटेफोडे, आयुष राहूल चक्रे, जय नंदू वानखेडे, गणेश उर्फ घंट्या प्रकाश लांडगे, प्रेम श्याम चिलके, सुरज सदानंद तायडे, अनिकेत देवानंद वरघट व प्रेम विजय वानखेडे याचा समावेश आहे. सहा अल्पवयीनांना बाल न्याय मंडळासमोर उपस्थित करण्यात आले.
 
 
सुमारे तीन लाखांचे नुकसान
 
 
शुक्रवारी रात्री हे टोळके दहा ते बारा दुचाकींवरुन शंकरनगर, केडीनगर भागात एकत्रितरित्या फिरत होते. अनेकांच्या हातात काठ्या व शस्त्र होते. सर्वसामान्यांना पाहून कोणी मधात यायचे नाही, नाहीतर मारुन टाकू असे धमकावत होते. याचवेळी त्यांनी काही कारची व एका दुकानात जावून तोडफोड करुन सुमारे तीन लाखाचे नुकसान केल्याचे पोलिसात दाखल तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0