युवा स्वाभिमानच्या १५४ उमेदवारांच्या मुलाखती

20 Dec 2025 20:28:55
अमरावती, 
yuva-swabhiman-party : युवा स्वाभिमान पार्टीच्या राजापेठ येथील मुख्य कार्यालयात येत्या महानगरपालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर उमेदवार निवड प्रक्रियेचा पहिला दिवस उत्साहात पार पडला. १९ डिसेंबर हा दुसरा दिवस असून तब्बल १५४ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती निवडणूक मुलाखत समितीकडून घेण्यात आल्या.
 
 
 
AMT
 
 
 
या मुलाखतींमध्ये उमेदवारांचा सामाजिक कार्याचा अनुभव, पक्षनिष्ठा, जनसंपर्क, स्थानिक प्रश्नांची जाण तसेच निवडणूक जिंकण्याची क्षमता या विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ही प्रक्रिया पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने राबविण्यात येत आहे.
 
 
या मुलाखती राष्ट्रीय अध्यक्ष नीळकंठ कात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. यावेळी मार्गदर्शक म्हणून सुनील राणा, तसेच समिती सदस्य प्रा. अजय गाडे, नंदेश अंबाडकर, शैलेंद्र कस्तुरे, जयंत वानखडे, हरीश चरपे, कमलकिशोर मालानी, शिवदास घुले, संजय हिंगासपुरे, सोनाली नवले, ज्योती सैरिसे, संजय मुनोत, मनोज चांदवानी, प्रा. सतीश खोडे, प्रा. संतोष बनसोड, गंगाधर आवारे बाळू इंगोले आणि अवी काळे उपस्थित होते.
 
 
पक्षाच्या ध्येयधोरणांशी प्रामाणिक राहून काम करणार्‍या आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढणार्‍या उमेदवारांना संधी देण्याचा मानस पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला. येत्या काही दिवसांत उर्वरित उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असून त्यानंतर कोअर कमिटीने निर्णय घेतल्यानंतर अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. महानगरपालिका निवडणुकीत युवा स्वाभिमान पार्टी भक्कम ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे संकेत या प्रक्रियेतून स्पष्ट होत आहेत.
Powered By Sangraha 9.0