चंद्रपूर,
bachchu-kadu : प्रहार संघटनेचे संस्थापक तथा माजी आमदार बच्चू कडू यांनी शनिवार, 20 डिसेंबर रोजी शेतकरी रोशन कुळे यांची भेट घेतली. नागभीड तालुक्यातील मिंथुर येथील रहिवासी कुळे यांना सावकारी कर्जाची परतफेड करण्यासाठी स्वत:ची किडनी विकावी लागली होती. हे प्रकरण प्रकाश झोतात येताच, सार्याचे लक्ष आता मिंथुर गावाकडे लागले आहे. कुळे यांच्या भेटीला बच्चू कडे मिंथुर येथे आले होते. या भेटीप्रसंगी रोशन कुळे यांना अश्रू अनावर झाले.
रोशन यांनी बच्चू कडू यांना आपली आपबिती सांगितली. त्यावर कडू यांनी संताप व्यक्त केला. शेतकर्याला कर्जाची परतफेड करण्यासाठी किडनी विकावी लागत असेल तर पुरोगामी महाराष्ट्र कोणत्या दिशेला चालला आहे, असे ते म्हणाले. हा गंभीर प्रकार असून, ही लढाई एकट्या रोशनची नसून आपल्या सर्वांची आहे. त्यासाठी येत्या 3 जानेवारीला मिंथुरपासून नागभीडपर्यंत मोठा ‘लाँगमार्च’ अशी घोषणाही यावेळी बच्चू कडू यांनी केली.
कडू म्हणाले, कर्जाची परतफेड करण्यासाठी कुळे यांना किडनी विकावी लागली, हा प्रकार अतिशय गंभीर आहे. याची दखल राज्य शासनाने त्वरित घ्यावी. रोनश यांना धमक्यांचे फोन येत होते, त्यांचे अपहरण करण्यात आले आहे. त्यामुळे त्याला किडनी विकावी लागली. त्यासाठी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याचबरोबर फसवणुकीचा गुन्हाही दाखल झाला पाहिजे. तसेच जबर मारहाणीचा गुन्हा दाखल केला नसल्याने तो पण गुन्हा दाखल झाला पाहिजे. रोशन यांनी कंबोडिया या देशात किडनी विकायला गेला याची ‘एसआयटी’ चौकशी झाली पाहिजे. राज्यामध्ये सावकरी प्रकरणाचे गुन्हे सर्रास सुरु आहे. त्याबरोबर मायक्रो फायनान्स या कंपन्यांवरसुद्धा बंधने आणली पाहिजे. ही लढाई नागभीडपुरती नाही किंवा एकट्या रोशन पुरती नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राची आणि देशव्यापी आहे. रोशन कुळे या शेतकर्याला त्याचे पैसे परत मिळाले पाहिजे. कारण त्याने आजच्या बाजार भावापेक्षा कमी भावाने शेती विकली आहे. 3 जानेवारीला रोशनच्या घरापासून ते नागभीडपर्यंत पायदळ मोर्चा काढला जाणार असून, मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मोठे आंदोलन करणार असल्याचेही बच्चू कडू यांनी सांगितले.