जिल्ह्यातील ११ नगर परिषदेमध्ये उद्या मतमोजणी

20 Dec 2025 20:21:44
बुलढाणा, 
municipal-council-vote-counting : नगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीची दहा नगरपरिषदामध्येे मतदान प्रक्रिया दि. २ डिसेंबर रोजी तर देऊळगावराजा या नगर परिषदेमध्ये २० डिसेंबर रोजी पार पडली. जिल्ह्यातील ११ ही नगर परिषदांमध्ये आज दि. २१ डिसेंबर रोजी मतमोजणीला सकाळी १० वाजता प्रारंभ होणार आहे. त्यामुळे प्रशासन सज्ज झाले असून उमेदवारासहित जनतेमध्ये सुद्धा निकालांची उत्कंठा वाढली आहे.
 

L 
 
 
 
बुलढाणा नगर परिषदेचे मतमोजणी येथील नगर परिषदेच्या सभागृहामध्ये पहिल्या मजल्यावर होणार आहे. मतजोजणीसाठी ८ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या फेरीत ८ प्रभाग तर दुसर्‍या फेरीत ७ प्रभागातील मतमोजणी होणार आहे. चिखली नगर परिषदेची मतमोजणी तालुका क्रिडा संकुल कार्यालय येथे होणार असून १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.  देऊळगावराजा नगर परिषदेची मतमोजणी नगरपरिषदेच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात होणार असून १० टेबल वर मतमोजणी करण्यात येणार आहे. सिंदखेडराजा नगर परिषदेची मतमोजणी नगर परिषदेच्या सभागृहात होणार आहे. ४ टेबलची व्यवस्था मतमोजणीसाठी करण्यात आली आहे.
 
 
लोणार नगरपरिषदेची मतमोजणी शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था येथे होणार असून ७ टेबलची व्यवस्था मतमोजणीसाठी करण्यात आली आहे. मेहकर नपाची मतमोजणी तालुका क्रिडा संकुल कार्यालय येथे होणार असून १३ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. खामगाव नपा ची मतमोजणी तहसिल कार्यालयातील राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृहात करण्यात आली असून १७ टेबल मतमोजणीसाठी राहणार आहे. शेगांव नगर परिषदेची मतमोजणी तहसिल कार्यालय नवीन इमारत येथे होणार असून ८ टेेबलवर ही मतमोजणी होणार आहे. मलकापूर नगर परिषदेची मतमोजणी शासकीय तंत्र माध्यमिक विद्यालय येथे होणार असून ८ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
 
नांदूरा नगर परिषदेची मतमोजणी तहसिल कार्यालय नवीन इमारत येथे होणार असून मतमोजणीसाठी १२ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. तर जळगाव जामोद नगर परिषदेची मतमोजणी नगर परिषद योगा सभागृह येथे करण्यात आली असून ५ टेबलवर ही मतमोजणी करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक नगर परिषदेमध्ये टपाली मतमोजणीसाठी एका टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. आज सकाळी दहा वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार असून १९ दिवसापासून निवडणूकीच्या निकालाची उत्कंठा लागलेल्या उमेदवारांचे भाग्य उलगडणार आहे. बुलढाणा शहरात विजयी मिरवणूक तसेच डीजे वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील नगर परिषदेच्या निवडणूक मतमोजणीच्या कारणामुळे नगरपालिका क्षेत्रातील मद्यपान विक्रीचे दुकाने आज दि. २१ डिसेंबर रोजी बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0