बुलडाणा,
spiritual-gathering : सर्व वादांची मुळ आपल्या नकारात्मक विचारात आहेत, तर सर्व उपायांचा पाया सकारात्मक विचारांवर आहे. ग्लास अर्धा भरलेला दिसला तर कमी असलेल्याचाही उपयोग करता येतो; आणि तोच ग्लास अर्धा रिकामा दिसला तर सख्या भावाशीही नातं तोडावंसं वाटतं. यशाची गुरुकिल्ली म्हणजे ग्लास नेहमी भरलेला पाहा. कुणामध्ये काही उणीव असेल तर त्याच्याशी समजूत काढा. विटेसारखा उपयोग नसेल तरी मातीसारखा उपयोग सगळ्यांचाच होऊ शकतो. असे विचार राष्ट्रसंत ललित प्रभ मुनीश्री यांनी व्यक्त केले.
सदभावना सेवा समिती व सकल जैन संघ यांच्या वतीने दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ दरम्यान दादावाडी परिसर, मलकापूर रोड येथील एआरडी लॉन्समध्ये आयोजित जिण्याची कला या प्रवचनमालेच्या पहिल्या दिवशी ते भाविकांना संबोधित करत होते.
ते पूढे म्हणाले की, संकुचित विचार, स्वार्थी विचार, निराशेने भरलेले विचार, आळशी विचार आणि अहंकारी विचार या सर्व विचारांच्या विकृती आहेत. मनाच्या शेतातील या झाडाझुडपाना उपटून टाका. तुमच्या मेंदूची जमीन सुपीक आहे; नवी ऊर्जा व उत्साहाने सर्वांना गोड फळ देणारी बीजं पेरा. ज्या शेजार्याबद्दल जळजळ आहे, ज्या सासूबद्दल तक्रार आहे, ज्या वडिलांबद्दल वेदना आहेत, ज्या ग्राहकाबद्दल ग्लानी आहे. त्यांच्याविषयी केवळ १० मिनिटांसाठी तुमचे विचार सुंदर व सकारात्मक करून पाहा; तुम्ही त्यांना मिठी मारायला उत्सुक व्हाल.
उगीचच्या वादात पडू नका. तुमच्याकडे विचारले जाईल तेव्हाच कुणाच्या कामात हस्तक्षेप करा. अनावश्यक टोमणे, टीका-टिप्पणी शत्रू वाढवते आणि ज्याचे शत्रू जास्त, त्याचा डोकेदुखीही जास्त. समन्वयाची भूमिका स्वीकारा. जसा माहोल मिळेल तसा जुळवून घ्या. स्वतःला हसतमुख गुलाबाचे फूल बनवा. सतत जुन्याच दुःखांची तक्रार करत राहिलात तर स्वतःच्याच काट्यांत अडकून पडाल; पण हसण्याची सवय लावलीत तर इतरांचेही अश्रू पुसू शकाल. ईश्वरावर विश्वास ठेवण्याचे आवाहन ललित प्रभ यांनी केले. भाग्याने ९९ दरवाजे बंद केले तरी ईश्वर तुमच्यासाठी कुठला तरी एक दरवाजा नक्की उघडतो, असे त्यांनी सांगितले.
याच प्रसंगी डॉ. मुनिश्री शांतिप्रिय सागरजी महाराज म्हणाले की, माणूस असण्याची पहिली अट म्हणजे सतत हसतमुख राहणे. प्राणी कधीही हसू शकत नाही. तुम्ही हसू शकत असाल तरच आरशात पाहा, अन्यथा नाही. हसू हे थकलेल्या माणसासाठी विश्रांती आहे, उदास माणसासाठी दिवसाचा प्रकाश आहे आणि दुःखातून मुक्त होण्यासाठी निसर्गाचे सर्वोत्तम वरदान आहे. हसू हे असे दागिने आहे की जे न खरेदी करता घालता येते; आणि जोपर्यंत हे दागिने तुमच्याकडे आहेत, तोपर्यंत सुंदर दिसण्यासाठी दुसर्या कुठल्याही गोष्टीची गरज नाही.
यापूर्वी राष्ट्रसंतांच्या दादावाडी परिसरात आगमनावेळी शेकडो भाविकांनी भव्य शोभायात्रेसह त्यांचे अद्भुत स्वागत व अभिनंदन केले. कार्यक्रमात स्वागतगीत निकिता देशलहरा, रक्षा देशलहरा, निधी देशलहरा व भावना कोठारी यांनी सादर केले. या प्रसंगी दीपप्रज्वलन जिल्हाधिकारी किरण पाटील, आमदार चैनराज सुखसंचेती, चंपालाल शर्मा, राजेश देशलहरा, जितेंद्र कोठारी, इंदरचंद कोटेचा व मोहन शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. मंच संचालन राजेश देशलहरा यांनी केले, तर आभार अॅड. जितेंद्र कोठारी यांनी मानले.