तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
polling-station : यवतमाळ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना प्रभाग क्रमांक 15 मध्ये दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. दोन गट एकमेकांना भिडल्याने या परिसरात काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता. या हिंसाचारात एकाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली असून इतर दोनजण जखमी झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, प्रभाग क्रमांक 15 मधील अंजुमन उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू असताना दोन्ही गट समोरासमोर आले. मैदानाच्या विषयावरून प्रारंभी दोन्ही गटात शाब्दिक चकमक झाली. मात्र काही वेळातच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटांनी एकमेकांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढवला आणि एकमेकांवर दगडफेक केली.
या तुंबळ हाणामारीत एका व्यक्तीच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली, तर इतर नागरिकही जखमी झाले. या हाणामारीत एकूण 3 ते 4 जणांना दुखापत झाली. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे बघून तातडीने अतिरिक्त पोलिस कुमक मागवण्यात आली. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी प्रयत्न केले. या परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.