वर्षाच्या अखेरीस पांढर्‍या सोन्याचाही होईल ‘दी एंड’

20 Dec 2025 20:07:08
सिंदी (रेल्वे), 
wardha-news : यंदाच्या खरीप हंगामात अवकाळी पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे कपाशी व सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट आली. या इंग्रजी वर्षाचा शेवट होत असताना कापूस पिकाचा देखील ‘दी एंड’ होण्याची चिन्हं आहेत. कपाशीने केव्हाच राम म्हटला आणि दोन किंवा तिसर्‍या वेच्यानंतर यंदा उलंगवाडी ठरली आहे.
 
 
KAPUS
 
सोयाबीनची शेतं तयार करून तेथे हरभरा किंवा गहू पेरण्यात आला. सोयाबीनवर शेतकर्‍यांनी केलेला खर्च भरून निघाला नाही. कर्जाचा डोंगर वाढत आहे तो वेगळाच! कपाशी साथ देईल असे वाटत असताना बोंडअळींनी उच्छाद मांडला. उत्पन्न घटणार सोबतच दरवाढीची शयता मावळल्यामुळे शेतकर्‍यांचा पूर्णत: भ्रमनिरास झाला आहे.
 
 
जून महिन्यात शेतकर्‍यांना ऐनवेळी बँकांकडून मदतीचा हात मिळाला नाही तरी खरीप हंगाम सजवला होता. पावसाने हुलकावणी दिली तरी दोन ते तीनदा पेरणी केली. पिकांना पावसाची गरज होती तेव्हा बरसला नाही. नंतर मात्र धो-धो बरसला. जिल्ह्यात जवळपास तीनवेळा अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे अनेक शेत शिवारातील पिके खरडून गेली. पोळ्यानंतर सुद्धा सलग पावसाने पिच्छा सोडला नाही. शिवाय, अवकाळी पावसाने अगदी दिवाळीपर्यंत हजेरी लावल्यामुळे कपाशीचे पीक सडायला सुरूवात झाली होती. तुरीचे पीक आणि कपाशीवर गर्द धुयाचा दुष्परिणाम झाला. त्यात खोडा घातला शेतमालांच्या कमी दरांमुळे; शेतकर्‍यांना नको ती शेती म्हणायची वेळ आली आहे, हे मात्र एवढे मात्र खरे!
Powered By Sangraha 9.0