देवळीत उशिरापर्यंत चालले मतदान; जिल्ह्यात ५९ टक्के मतदारांनी बजावला हक

20 Dec 2025 20:34:13
वर्धा, 
deoli-voting : वर्धा जिल्ह्यातील देवळी नगर पालिकेत नगराध्यक्षसह २० नगरसेवक तर वर्धेत २, हिंगणघाट येथे ३ तर पुलगाव येथे २ असे १ नगराध्यक्ष व २७ नगरसेवकपदांसाठी २० रोजी मतदान झाले. देवळी येथे रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होती. जिल्ह्यात सायंकाळी ५.३० पर्यंत वर्धेत ५६.०५ टके, हिंगणघाट येथे ५९.८७ टके, पुलगाव येथे ५७.६६ टके तर देवळी येथे ६२ टके असे जिल्ह्यात सरासरी ५९ टके मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी तरुण भारतसोबत बोलताना दिली.
 
 
K
 
देवळी नगर परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या व दहा प्रभागातील वीस उमेदवारांकरिता सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाले. थंडीमुळे संथ गतीने सुरू असलेले मतदानाला दुपारनंतर गती मिळाली. आयोगाच्या नियमानुसार मतदान बंद होताना मतदार मतदान केंद्रावर असल्याने काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रीया सुरू होती.
 
 
देवळी नगरपरिषद निवडणुकीसाठी सरासरी ६५ टके मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नगर परिषद उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक ४ मतदान केंद्रावर प्रभाग क्रमांक तीन मधील एक व दोन केंद्रावर मतदान करणार्‍यांची लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या संदर्भात विचारणा केली असता मतदार चार वाजेनंतर मोठ्या संख्येने मतदान करण्याकरता आल्यामुळे मतदानाची वेळ संपल्यानंतरही लांबच लांब रांगा मतदारांच्या दिसून आल्या. तचेच इतर २ मतदान केंद्रावरही वेळ संपल्या नंतरही मतदान सुरु होते. देवळी शहरातील सर्व मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्रकार घडलेला नाही व निवडणूक सुरळीतपणे पार पडली. पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी इंदिरानगर परिसरात असलेल्या दोन बूथसह सर्व बुथच्या सुरक्षेचा आढावा घेतला. उपविभागीय पोलिस अधिकारी वंदना कारखेडे यांनी संपूर्ण मतदान प्रक्रिये दरम्यान बंदोबस्तावर लक्ष ठेवले. ठाणेदार अमोल मंडळकर यांच्या नेतृत्वात देवळी पोलिस, गृहरक्षक दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला.
 
 
हिंगणघाट : स्थगित झालेल्या प्रभाग क्रमांक ५ येथील अ व ब गटातील दोन तसेच प्रभाग ९ येथील अ गटातील एका नगरसेवक पदाकरिता निवडणूक प्रक्रिया आज शांततेत पार पडली. जवळपास ५७ ते ६० टके मतदान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. दुपारपर्यंत मतदान प्रक्रिया मंद होती. प्रभाग ५ मध्ये अ गटात ५ महिला तर ब ७ पुरुष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत तर प्रभाग क्रमांक ९ ब गटातील ९ पुरुष उमेदवार मध्ये सामना रंगला आहे.
 
 
पुलगाव : पुलगाव शहरात दोन प्रभागाच्या थांबलेल्या निवडणुकीचे मतदान २० ला शांततेत पार पडले. प्रभाग ५ मध्ये ५५ टके मतदान झाले तर प्रभाग २ मध्ये ६२ टके मतदान झाले.
 
 
देवळीत मतदार यादीत घोळ
 
 
नगर परिषदेच्या देवळी निवडणुक याद्यांमध्ये मोठ्या प्रकारचा घोळ दिसून आला. मतदारांना वाटण्यात आलेल्या चिठ्ठ्या व मतदान केंद्रावर बुथ प्रतिनिधी जवळ असलेल्या याद्या यामध्ये प्रचंड तफावत होती. त्यामुळे मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला. मतदारांना वाटण्यात आलेल्या चिठ्ठ्या व मतदान केंद्रावरील यादीमध्ये दोन अंकाचा तफावत दिसून आल्याने मतदारांना नाव शोधण्याकरिता धावपळ करावी लागली. तर काही मतदार माघारी गेले. काही लोकांचे नावे दुसर्‍या प्रभागात गेल्याने मनस्थाप सहन करावे लागले. निवडणूक आयोगाद्वारे वाटण्यात येणार्‍या चिठ्ठ्या मतदारांपर्यंत पोहोचू न शकल्याने ही गडबड झाल्याचे निदर्शनास आले.
Powered By Sangraha 9.0