राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक; आठ हत्ती ठार

20 Dec 2025 09:26:22
होजई,
Eight elephants killed by the Rajdhani Express आसाममधील होजई जिल्ह्यात शनिवारी पहाटे रेल्वे अपघाताची धक्कादायक घटना घडली. सैरंगहून नवी दिल्लीकडे जाणारी राजधानी एक्सप्रेस धावत्या अवस्थेत असताना अचानक हत्तींच्या कळपावर आदळली. या अपघातात आठ जंगली हत्तींचा मृत्यू झाला असून एक हत्ती गंभीर जखमी अवस्थेत आढळला आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची अधिकृत माहिती दिली आहे. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की ट्रेनचे इंजिन आणि पाच डबे रुळावरून घसरले. ईशान्य सीमा रेल्वेच्या प्रवक्त्यानुसार, हा अपघात जमुनामुख आणि कामपूर स्थानकांदरम्यान चांगजुराई परिसरात पहाटे सुमारे २ वाजून १७ मिनिटांनी झाला. सुदैवाने, या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही, ही दिलासादायक बाब ठरली.
 
 

Eight elephants killed
नागाव विभागाचे वन अधिकारी सुहास कदम यांनी सांगितले की, माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या कळपात सुमारे आठ हत्ती होते आणि धडकेनंतर बहुतेक हत्तींचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, ट्रॅकवर हत्ती दिसताच लोको पायलटने तात्काळ आपत्कालीन ब्रेक लावले, मात्र अंतर कमी असल्याने आणि हत्ती पळून न गेल्यामुळे टक्कर टळू शकली नाही.
विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा अपघात झाला तो परिसर अधिकृत हत्ती कॉरिडॉर म्हणून ओळखला जात नाही. अपघातानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव त्या मार्गावरील गाड्या अप लाईनवर वळवण्यात आल्या आहेत. रुळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून अपघात मदत गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. रुळांवर हत्तींचे अवशेष पडल्यामुळे अप्पर आसामसह ईशान्य भारतातील काही भागांतील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. सैरंग-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस ही मिझोरममधील सैरंग, म्हणजेच ऐझवालजवळील भाग, आणि दिल्लीतील आनंद विहार टर्मिनल यांना जोडणारी महत्त्वाची लांब पल्ल्याची ट्रेन असून या दुर्दैवी घटनेमुळे वन्यजीव संरक्षण आणि रेल्वे सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Powered By Sangraha 9.0