गाझा शांतता दलात पाकिस्तानचा सहभाग; अमेरिकेचे स्वागत

20 Dec 2025 12:33:29
इस्लामाबाद,  
gaza pakistan गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमध्ये तणाव जाणवत असताना, अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. अशाच पार्श्वभूमीवर गाझा पट्ट्यात सुरू असलेला इस्रायल-हमास संघर्ष थांबवण्यासाठी प्रस्तावित आंतरराष्ट्रीय स्थिरीकरण दलात सहभागी होण्याचा पाकिस्तानने घेतलेला निर्णय अमेरिकेने स्वागतार्ह ठरवला आहे.
 
 

gaza 
 

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानच्या या भूमिकेचे कौतुक करत गाझा प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना रुबियो यांनी सांगितले की, गाझा शांतता दलाचा भाग बनण्याची किंवा किमान त्या दिशेने विचार करण्याची तयारी पाकिस्तानने दर्शवली आहे. या पुढाकाराबद्दल अमेरिका पाकिस्तानची आभारी आहे. संघर्ष सोडवण्यासाठी पाकिस्तानसारख्या देशांचा सहभाग महत्त्वाचा ठरू शकतो, कारण असे देश सर्व संबंधित पक्षांना तुलनेने स्वीकारार्ह असतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सैन्य पाठवण्यास पाकिस्तानने थेट संमती दिली आहे का, या प्रश्नावर उत्तर देताना रुबियो म्हणाले की, या दलाचा भाग बनण्याची किंवा त्याचा विचार करण्याची पाकिस्तानची ऑफर हीच सध्या महत्त्वाची बाब आहे आणि त्याबद्दल अमेरिका कृतज्ञ आहे.

गाझा संघर्ष ऑक्टोबर २०२३ मध्ये हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर सुरू झाला होता. त्यानंतर इस्रायलने मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई करत प्रत्युत्तर दिले. तेव्हापासून हा संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिका सातत्याने राजनैतिक प्रयत्न करत आहे. या संघर्षामुळे गाझा पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर मानवी संकट निर्माण झाले असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी विविध पर्यायांवर चर्चा सुरू आहे.

मार्को रुबियो यांच्या वक्तव्यांवरून अमेरिकेची गाझाबाबतची भूमिका अधिक स्पष्ट होत आहे. हमासला पुन्हा लष्करीदृष्ट्या बळकट होण्यापासून रोखण्यासाठी गाझामध्ये एक मजबूत प्रशासकीय आणि सुरक्षा व्यवस्था उभारण्याच्या दिशेने अमेरिका काम करत आहे. ही रणनीती टप्प्याटप्प्याने राबवली जाणार असल्याचे संकेत देण्यात येत आहेत.

एकीकडे भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणावाची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे पाकिस्तानबरोबर वाढत असलेले हे सहकार्य दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वेतील बदलत्या राजनैतिक समीकरणांकडे लक्ष वेधून घेत आहे.gaza pakistan गाझा शांततेच्या प्रक्रियेत पाकिस्तानची भूमिका नेमकी कशी असेल, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Powered By Sangraha 9.0