४६५ उमेदवारांचे उद्या उघडणार भाग्य

20 Dec 2025 19:38:43
गोंदिया, 
election-result : जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा नगरपरिषद व गोरेगाव, सालेकसा नगरपंचायतीच्या एकूण ९८ जागांसाठी ४६५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यातील नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या ९४ जागांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. या चारही ठिकाणी सरासरी ६४.३९ टक्के मतदान झाले. तर ऐनवेळी निवडणूक आयोगाने गोंदिया व तिरोडा नगर परिषदेच्या चार जागांसाठीची मतदानाची प्रक्रिया पुढे ढककली. त्यासाठी आज, २० डिसेंबर रोजी मतदान झाले. या ४ जागेसाठी दुपारी २०२९ वाजतापर्यंत ४७.३४ टक्के मतदान झाले. या दोन्ही टप्प्यातील एकत्रित मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे.
 
 
GONDIA
 
 
तब्बल साडेतीन वर्ष जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका थांबल्या होत्या. त्यामुळे राजकीय पक्षांसह सर्वसामान्य मतदारांनाही निवडणुकीच्या प्रतिक्षा होती. दरम्यान निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा नगर परिषद तसेच गोरेगाव व सालेकसा नगर पंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार ४ नगराध्यक्ष व ९४ नगरसेवकांच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी होणार होत्या. त्यासाठी नगराध्यक्षपदासाठी २७ उमेदवार तर नगरसेवकपदासाठी ४३८ उमेदवार रिंगणात होते. परंतु मतदानापूर्वी निवडणूक आयोगाने गोंदिया नगर परिषदेतील ३ प्रभागात व तिरोडा नगर परिषदेतील १ प्रभागातील मतदान पुढे ढकलले. त्यामुळे २ डिसेंबर रोजी या ४ जागा वगळता नगराध्यक्षासह नगरसेवकांच्या ९४ जागांसाठी मतदान घेण्यात आले. या मतदानाची टक्केवारी ६४.३९ एवढी होती. यात गोंदिया नगरपरिषदेसाठी सर्वात कमी ६१.८५ टक्के, तिरोडा नगरपरिषदेमध्ये ६५.६२ टक्के तर सालेकसा नगरपंचायतीत सर्वाधिक ८४.९० टक्के आणि गोरेगाव नगरपंचायतमध्ये ८०.९० टक्के मतदान झाले. परंतु मतदान मोजणीची तारीख तब्बल १९ दिवस पुढे गेल्याने रिंगणातील उमेदवारांची धडधड वाढली तर मतदारांची आपला नगराध्यक्ष कोण?, नगरसेवक कोण? याची उत्सुकता ताणली गेली. ती धडधड, उत्सुकता आज, २१ डिसेंबर रोजी होणार्‍या मतमोजणीनंतर जाहीर होणार्‍या निकालाअंती थांबणार आहे.
 
 
चार जागेवर ४७.३४ टक्के मतदान
 
 
तिरोडा येथील प्रभाग क्रमांक १० (ब), गोंदिया येथील प्रभाग क्रमांक ३ (ब), प्रभाग क्रमांक ११ (ब), आणि प्रभाग क्रमांक १६ (अ) मधील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यासाठी तिरोड्यातील १ जागेसाठी ३ उमेदवार आणि गोंदियातील ३ जागेसाठी १५ उमेदवार रिंगणात होते. यासाठी आज, २० डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात गोंदिया नगर परिषदेतील ३ जागेसाठी दुपारी ३.३० वाजतापर्यंत ४५.७० टक्के मतदान, तर तिरोडा नगर परिषदेतील १ जागेसाठी ५८.५९ असे एकूण ३ जागांसाठी ४७.३४ टक्के मतदान झाले.
 
 
अशी होणार मतमोजणी...
 
 
जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा नगर परिषद तसेच गोरेगव व सालेकसा नगर पंचायत निवडणुकीसाठी दोन टप्प्यात झालेल्या मतदानाची एकत्रित मतमोजणी आज, २१ डिसेंबर रोजी होणार आहे. यात गोंदिया येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात १० टेबलावरून ११ फेर्‍यांमध्ये मतमोजणी होणार आहे. तिरोडा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ५ फेर्‍यांमध्ये, गोरेगाव येथे तहसील कार्यालयात ५ टेबलावरून ५ फेर्‍यात आणि सालेकसा येथे तहसील कार्यालयात ५ टेबलावरून ४ फेर्‍यांमधून मतमोजणी सुरू होणार आहे. सर्व ठिकाणी सकाळी १० वाजतापासून मतमोजणी सुरू होणार दुपारी २ वाजतानंतर बहुतांश ठिकाणचे चित्र स्पष्ट होणार आहे.
Powered By Sangraha 9.0