गोंदिया,
the-shortest-day-of-the-year : सूर्याचे स्थळ दररोज किंचित बदलत असते. काही दिवसांच्या फरकाने हा बदल आपल्या लक्षात येतो. रविवार, २१ डिसेंबरला सूर्य पृथ्वीच्या मकर वृत्तावर येईल. त्यामुळे या दिवशी आपल्या भागात सर्वांत लहान दिवस १० तास ९ मिनिटाचा व रात्र १३ तास ५१ मिनिटाची राहणार आहे. २१ डिसेंबरला सूर्य नेमका मकरवृत्तावर असेल व नंतर सूर्याचे उत्तरेकडे सरकणे सुरू होणे हाच उत्तरायणाचा प्रारंभ असतो. यावेळी दक्षिण गोलार्धात तापमान अधिक असल्याने उन्हाळा व उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. आपल्या भागात यावेळी दिवस सर्वात लहान तर रात्र मोठी असेल. यापुढे दिनमान वाढायला लागून त्याचा फरक मकरसंक्रांतीपासून जाणवतो. २२ सप्टेंबर नंतर सूर्य विषुववृत्त ओलांडून दक्षिणेकडे सरकू लागतो. तेव्हा दक्षिणायनास प्रारंभ होतो.

आता मात्र दिनमान कमी होऊन रात्रमान वाढत जाते. २१ डिसेंबर रोजी सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूला हिवाळी अयन दिवस असे म्हणतात. या बिंदूत सूर्य असतांनाचा दिवस हा वर्षातील सर्वात लहान दिवस व रात्र ही सर्वात मोठी असते. यावेळी रविवारचा दिवस हा फक्त १० तास ९ मिनिटांचा असेल तर रात्र ही १३ तास ५१ मिनिटांची असेल. दैनंदिन जीवनात दिवस व रात्रीचा कालावधी कमी जास्त होणे याचा अनुभव आपण नेहमीच घेत असतो. पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशांनी तिरपा असल्याने हे घडत असते व म्हणूनच सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन सुद्धा आपल्याला अनुभवता येते. एखाद्या वस्तूच्या सावलीचे विशिष्ट वेळी नियमितपणे निरीक्षण केल्यास, सूर्य कसा दक्षिणेकडे व उत्तरेकडे सरकतो हे सहज आपल्या लक्षात येते. पृथ्वीवरील ऋतू सुद्धा पृथ्वीच्या अक्षाच्या कलत्या स्थितीमुळेच निर्माण होतात. सूर्याभोवती फिरताना कधी पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्याकडे असतो तर कधी दक्षिण ध्रुव सूर्याकडे असतो. जेव्हा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव जास्तीत जास्त सूर्याकडे असतो तेव्हा उत्तर गोलार्धातील दिवसाची लांबी कमीत कमी असते. आपला देश उत्तर गोलार्धात असल्यामुळे यावेळी दिवसाची लांबी कमीत कमी राहील, असे स्काय वॉच ग्रुपच्यावतीने सांगण्यात आले. वातावरण तापण्यासाठी कमी वेळ मिळतो व थंड होण्यास जास्त. त्यामुळे जसजसा दिवसाचा कालावधी कमी होत जातो तसतशी थंडी वाढू लागते. मकर संक्रांतीनंतर दिवस वाढत जातो. दिवसाचा कालावधी लहान अशी संकल्पना समाजात रूढ आहे. प्रत्यक्षात मात्र २२ डिसेंबर पासूनच दिवस वाढायला लागतो.