इस्लामाबाद,
Imran Khan–Bushra Bibi guilty पाकिस्तानात माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी आणखी वाढल्या असून, तोशाखाना-2 प्रकरणात त्यांना आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना तब्बल 17 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शनिवारी विशेष संघीय तपास संस्थेच्या (एफआयए) न्यायालयाने हा निकाल दिला. या प्रकरणात महागड्या बुल्गारी दागिन्यांचा संच अत्यंत कमी किमतीत खरेदी केल्याचा आरोप इम्रान खान आणि बुशरा बीबी यांच्यावर होता.
रावळपिंडीतील आदियाला तुरुंगातच सुनावणी पार पडली, कारण इम्रान खान सध्या तेथे कैद आहेत. विशेष न्यायाधीश शाहरुख अर्जुमंद यांनी निकाल देताना इम्रान खान यांना पाकिस्तान दंड संहितेच्या कलम 409 अंतर्गत 10 वर्षांची सक्तमजुरी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत 7 वर्षांची शिक्षा सुनावली. त्याचप्रमाणे बुशरा बीबी यांनाही एकूण 17 वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला. न्यायालयाने दोघांनाही प्रत्येकी 1.64 कोटी रुपयांचा दंडही ठोठावला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे.
न्यायालयाने आदेशात नमूद केले की शिक्षा ठरवताना इम्रान खान यांचे वय आणि बुशरा बीबी यांची परिस्थिती विचारात घेण्यात आली असून, त्यामुळे तुलनेने सौम्य दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आहे. मात्र, सरकारी भेटवस्तूंच्या नियमांचे उल्लंघन करून कमी किमतीत महागडे दागिने खरेदी केल्याने सरकारी तिजोरीचे नुकसान झाल्याचे न्यायालयाने मान्य केले. या निकालानंतर इम्रान खान आणि बुशरा बीबी यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात आव्हान देण्याचे संकेत दिले आहेत. त्यांचा दावा आहे की हा निर्णय कायदेशीर तरतुदी आणि वस्तुस्थितीच्या विरोधात आहे. पाकिस्तानच्या राजकारणात आधीच अडचणीत असलेल्या इम्रान खान यांच्यासाठी हा निकाल आणखी मोठा धक्का मानला जात आहे.