mumbai separate maharashtra ‘‘शुक पंजरि वा हरीण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैशी.’’ म्हणजे ज्याप्रमाणे राघू पिंजऱ्यात अडकतो किंवा हरिण जाळ्यात सापडतं, त्याप्रमाणे मराठी माणसाची फसगत झाली आहे, हे सुरुवातीलाच नमूद करू इच्छितो. आता तुम्ही विचाराल की ही फसगत केली कुणी? आणि झाली कशी व ती फसगत नेमकी आहे तरी काय? याचंही विवेचन पुढे करणार आहे. महाराष्ट्र धर्म हा शब्द समर्थ रामदासांनी दिला. दोन ठिकाणी प्रामुख्याने ‘महाराष्ट्रधर्म’ हा शब्द आढळतो. ‘‘मराठा तितुका मेळवावा । आपुला महाराष्ट्रधर्म वाढवावा ।’’ हे उपदेशपर वचन आहे. दुसऱ्यांदा हा उल्लेख सापडतो, जेव्हा समर्थांनी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना पत्र लिहिलं, त्यात ते श्रीमंत योगी, जाणता राजा अशाप्रकारे शिवाजी महाराजांची स्तुती करत म्हणतात, ‘‘या भूमंडळाचें ठायीं । धर्म रक्षी ऐसा नाही । महाराष्ट्रधर्म राहिला काही । तुम्हा कारिणे ।।’’ या महाराष्ट्रधर्म शब्दावरून आज प्रचंड मोठं राजकारण खेळलं जात आहे. गंमत म्हणजे समर्थांवर त्यांची जात पाहून टीका करणारेही महाराष्ट्रधर्म या शब्दाचा उच्चार करतात. आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आलीय. त्यामुळे आपल्याला काही ठेवणीतली वाक्ये ऐकायला मिळत आहेत. त्यातलं सर्वात जुनं आणि लोकांची फसगत करण्यासाठी परंपरागत वारपलं जाणारं वाक्य म्हणजे, ‘‘हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे.’’ प्रत्येक प्रांतातली काही प्रादेशिक अस्मिता असते, त्या अस्मितेला आव्हान देणारी विधाने केली तर स्थानिक जनता आकर्षित होते. हा एक डाव आहे. हे एक जाळं आहे!

1960 मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली. काँग्रेसला मुंबई महाराष्ट्राला देऊ नये, असे वाटत होते. यासाठी मोठे आंदोलन झाले. 105 हुतात्म्यांनी बळी देऊन हे आंदोलन यशस्वीही केले. मात्र मुंबई केंद्रशासित करण्याची भीती अनेक वर्षे मराठी माणसाला दाखवण्यात आली. लहान मुलाने घास घेतला नाही, तर मोठी माणसं बुवा आला म्हणून घाबरवतात. त्याचप्रमाणे निवडणूक आल्यावर मराठी माणसाने आपल्यालाच मतदान करावे, या हेतूने ‘‘मुंबई तोडण्याचा डाव आहे’’ म्हणत भीती दाखवली जाते. 1960 साली ही परिस्थिती खरोखर होती हे नाकारता येत नाही. पण आता परिस्थिती बदललेली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्राचे नेते तर बुलेट ट्रेनसारख्या विकासकामांनाही विरोध करत हा मुंबई तोडण्याचा डाव म्हणतात. मराठी अस्मितेच्या मुद्यावरून राजकारण करणाऱ्या नेत्यांनी या एका वाक्याच्या बळावर ‘‘बंगले’’ बांधले. पण मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला. मुंबईतील मराठी टक्केवारी कमी होण्याचे कारण आर्थिक आहेच पण घराचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. आता मुंबईत घरांच्या किमती खूप वाढल्या आहेत आणि सरासरी किंमत प्रति स्क्वेअर फूट 11,000 ते 24,000 रुपये आहे. एक 1 बीएचके फ्लॅट 60 लाखांपासून सुरू होतो, तर प्रीमियम भागात 1.5 कोटींपर्यंत जातो. लक्झरी घरांच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. मराठी निम्न किंवा मध्यमवर्गीय माणूस या किमतींमुळे घर विकत घेऊ शकत नाही. परवडणाऱ्या घरांच्या योजना अस्तित्वात असल्या तरी त्या अपुऱ्या आहेत. यासाठी कोणी प्रयत्न केलेले दिसत नाही. दुसरी गोष्ट, कितीही नाही म्हटलं तरी मुंबईत अन्य राज्यांतून येणाऱ्या कामगारांची संख्या प्रचंड आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी म्हणता म्हणता इथे अनेक लोक आजही येत आहेत. ही समस्या आहे, हे मान्य करून आपल्याला पुढे जावे लागणार आहे. हा भार या इवल्याशा शहरावर पडतोच आहे. पण त्याची कारणे वेगळी आहेत. त्यावर काम करायला हवे. मात्र मराठीचे कैवारी म्हणवून घेणारे राजकीय नेते अशा महत्त्वाच्या विषयांना प्रांतीय वादाचे स्वरूप देतात. पण अशा लोकांचे संबंध अनेक वर्षे मराठी न बोलता येणाऱ्याशी असतात. हेही लक्षात घेतले पाहिजे.
मराठी भाषा ही समृद्ध आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, समर्थ रामदास यांनी साहित्यात मोलाचा वाटा दिला आहे. महाराष्ट्रधर्म म्हणजे या वारशाचे रक्षण. पण आज मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत आहेत आणि इंग्रजीचा प्रभाव वाढला आहे. हा मुद्दा मराठीचे कैवारी हाती का घेत नाहीत. कारण त्यांची मुले इंग्रजी शाळेत शिकतात. त्यांची नातवंडे इंग्रजी शाळेत शिकणार आहेत. मग हे भाषेचे डोस सामान्य माणसाला का? आधी केले मग बोलले या संतांच्या वचनाप्रमाणे त्यांनी वागायला नको का? आता महाराष्ट्रधर्म या समर्थांनी दिलेल्या दिव्य शब्दाकडे येऊया. महाराष्ट्रधर्म हा काही स्वतंत्र धर्म नाही. हिंदू धर्माचे मराठी रूप आहे.
समर्थ लिहितात, ‘‘तीर्थक्षेत्रे ती मोडिलीं । ब्राह्मणस्थाने भ्रष्ट जाली । सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ।। देव, धर्म, गोब्राह्मण । करावया संरक्षण । हृदयस्थ जाला नारायण । प्रेरणा केली’’ मग हे सांगत पुढे समर्थ लिहितात, ‘‘उदंड पंडित पुराणिक । कवीश्वर याज्ञिक वैदिक । धूर्व तार्किक सभानायक । तुमच्या ठायी ।। या भूमंडळाचे ठायी । धर्म रक्षी ऐसा नाही । महाराष्ट्रधर्म राहिला काही । तुम्हा कारिणे ।।’’ याचा अर्थ इतका स्पष्ट आहे की समर्थ छत्रपतींना धर्मरक्षक म्हणतात. समर्थ आनंदवनभुवनी या काव्यात लिहितात, ‘‘बुडाले सर्व ही पापी । हिंदुस्थान बळावले । अभक्तांचा क्षयो जाला । आनंदवनभुवनी’’ तसेच ‘‘बुडाला औरंग्या पापी । म्लेंछसंहार जाहला । मोडलीं मांडली छेत्रें । आनंदवनभुवनी ।’’ इथे समर्थ ‘‘हिंदुस्थान, म्लेंछसंहार, औरंग्या’’ असे शब्द वापरतात. म्हणजे समर्थ रामदासांची भावना किती उदात्त आहे पाहा. छत्रपती शिवाजी महाराज हे परकीय शक्तींचा नायनाट करत आहेत, असं समर्थ म्हणत आहेत. त्यामुळे समर्थांनी दिलेला महाराष्ट्रधर्म हा शब्द प्रांतीय नसून राष्ट्रीय आहे. महाराष्ट्र हा हिंदुस्थानचा खड्गहस्त झाला पाहिजे हे सावरकरांचे विचार आहेत. हेच समर्थ रामदास वेगळ्या शब्दांत मांडतात. त्यामुळे मुंबईच्या काही स्वतंत्र समस्या आहेत. मराठी माणसाच्याही काही समस्या आहेत.mumbai separate maharashtra या स्वतंत्रपणे कोणाचाही द्वेष न करता सोडवल्या पाहिजेत. मराठी माणसाचे अर्थकारण, त्याच्यासाठी स्वस्तातली घरे, मराठी शाळा, महाराष्ट्रात मराठी भाषा बोलण्यास प्रोत्साहन असे अनेक विषय घेऊन त्याबद्दलच्या समस्या स्वतंत्रपणे सोडवता येतील. त्यासाठी अभ्यास करावा लागेल. पण स्वत:ला मराठीचे कैवारी म्हणवून घेणारे राजकीय नेते स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी मराठी माणसाची माथी भडकावत आहेत. आता कुणीही मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही किंवा वेगळी करू शकत नाही, हे मराठी माणसाने लक्षात घेतले पाहिजे. म्हणूनच मराठी माणसाने शुक म्हणजे राघू किंवा हरिण बनून यांच्या जाळ्यात अडकू नये.
लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री