तैवान,
Knife attack in Taiwan तैवानमध्ये एक भीषण आणि धक्कादायक घटना घडली असून, गर्दीच्या ठिकाणी एका व्यक्तीने अचानक हल्ला केल्याने तीन जणांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सबवे स्टेशनजवळील गजबजलेल्या रस्त्यावर घडली आणि त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने सर्वप्रथम गर्दीत धुराचे बॉम्ब फेकले. परिसरात अचानक धूर पसरल्याने लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. धूर कमी होताच त्या व्यक्तीने चाकू काढून समोर येणाऱ्या लोकांवर अंधाधुंद हल्ला सुरू केला. जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा पळत होते, काहीजण ओरडत मदतीची याचना करत होते. हल्लेखोर नंतर थेट सबवे स्टेशनच्या दिशेने पळाला आणि तेथेही त्याने लोकांवर हल्ला सुरूच ठेवला.

या हल्ल्यात तीन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ परिसराला वेढा घातला आणि हल्लेखोराचा पाठलाग सुरू केला. पाठलागादरम्यान हल्लेखोर अचानक कोसळला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिस तपासात हल्लेखोराचे आडनाव ‘चांग’ असल्याचे समोर आले असून, तो यापूर्वीही गुन्हेगारी प्रकरणांत सामील होता. त्याच्याविरोधात अनेक वॉरंट प्रलंबित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर हल्ल्याचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेनंतर तैवानचे पंतप्रधान चाऊ जंग-ताई यांनी प्रतिक्रिया देत तैपेई मेट्रो स्टेशन, रेल्वे स्थानके आणि विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्था तात्काळ कडक करण्यात आल्याचे सांगितले आहे. नागरिकांनी शांतता राखावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण रस्त्याच्या मधोमध बसलेला दिसतो. तो आपल्या बॅगेतून स्मोक बॉम्ब काढून गर्दीत फेकतो आणि त्यानंतर चाकू हातात घेऊन पळताना दिसतो. लोक घाबरून पळ काढत असल्याचे आणि संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरल्याचे या व्हिडिओत स्पष्टपणे दिसून येत आहे.