पैनगंगा प्रकल्पाच्या लढ्याला जरांगे यांचे बळ

20 Dec 2025 18:22:16
तभा वृत्तसेवा
आर्णी,
Lower Painganga project विदर्भ आणि मराठवाडा या दोन महत्त्वाच्या भागांच्या सीमेवर हजारो नागरिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न बनलेल्या निम्न पैनगंगा प्रकल्पाचा लढा आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. तब्बल तीन दशकांपासून रखडलेल्या आणि हजारो कुटुंबे उद्ध्वस्त करणाèया या प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या संघर्षाला नवे बळ मिळावे, यासाठी प्रकल्पविरोधी धरणविरोधी संघर्ष समिती व 95 गावांतील नागरिकांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्रिशूल पाटील यांच्या मध्यस्थीने ही महत्त्वाची बैठक पार पडली.
 

Lower Painganga project 
या भेटीत संघर्ष समितीने मनोज जरांगे यांना निम्न पैनगंगा प्रकल्पामुळे होणाèया या भयानक परिणामांची सविस्तर माहिती दिली. या प्रकल्पामुळे हजारो शेतकरी, आदिवासी कुटुंबे बेघर होणार असून सुपीक शेतजमिनी, घरे आणि धार्मिक स्थळे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
 
 
विशेष म्हणजे, पुनर्वसन, जमिनीची मोजणी, योग्य मोबदला आणि पारदर्शकता याबाबत शासनाने कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. प्रकल्पाला मंजुरी मिळून 30 वर्षे उलटली, तरी शासन आमचा विश्वास जिंकू शकले नाही. उलट बळजबरीने काम सुरू करून आवाज दाबला जात आहे, आंदोलकांवर गुन्हे दाखल करून दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे, अशी व्यथा समितीच्या पदाधिकाèयांनी मांडली.
 
 
मनोज जरांगे यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून, हा प्रश्न केवळ धरणाचा नसून माणसांच्या जगण्याचा आणि न्यायाचा आहे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. अन्यायाविरुद्ध लढणाèया जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याने या लढ्याला आता मोठे सामाजिक आणि राजकीय बळ मिळण्याची चिन्हे आहेत.
 
 
आता प्रकल्पाचा लढा राज्यभर गाजणार
या भेटीनंतर आता आंदोलनाची दिशा अधिक तीव्र केली जाणार असल्याचे संकेत धरणविरोधी संघर्ष समितीने दिले आहेत. मनोज जरांगे यांच्या संभाव्य सहभागामुळे हा लढा आता केवळ स्थानिक न राहता राज्यपातळीवर चर्चेचा विषय बनेल, असा विश्वास प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला. या भेटीप्रसंगी संघर्ष समितीचे मुबारक तंवर, प्रल्हाद गावंडे, बंडूसिंग नाईक, बंटी जोमदे, गजानन डाखोरे, भगवतप्रसाद तितरे, उत्तम भेंडे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0