वॉशिंग्टन,
Operation Hawkeye Strike अमेरिकेने सीरियामध्ये इस्लामिक स्टेट (आयसिस) विरुद्ध मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई सुरू केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार या ऑपरेशनला हॉकआय स्ट्राइक असे नाव देण्यात आले आहे. ही कारवाई १३ डिसेंबर रोजी पालमायरा येथे आयसिसने केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून राबवण्यात आली आहे, ज्यामध्ये दोन अमेरिकन सैनिक आणि एक नागरिक दुभाषी मारला गेला होता.
अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, सीरियामध्ये आयसिसने शूर अमेरिकन देशभक्तांची निर्घृण हत्या केली. अमेरिका या खुनी दहशतवाद्यांवर कडक आणि गंभीर कारवाई करीत आहे. आम्ही सीरियामधील आयसिसच्या गडांवर जोरदार हल्ला करत आहोत. ही जागा रक्ताने माखलेली आहे आणि अनेक समस्यांनी भरलेली आहे. आयसिसचा नाश झाला तर त्या प्रदेशाचे भविष्य उज्ज्वल असेल, असे त्यांनी म्हटले. ट्रम्प यांनी असेही स्पष्ट केले की, सीरियाला महानता परत मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या आणि सध्याच्या सीरियन सरकारच्या नेतृत्वाखालील प्रशासनाला आम्ही पूर्ण समर्थन देतो. अमेरिकनांवर हल्ला करणाऱ्या सर्व दहशतवाद्यांना चेतावणी आहे की, कोणत्याही प्रकारे अमेरिका किंवा त्याच्या नागरिकांना धोका निर्माण केल्यास पूर्वीपेक्षा अधिक जोरदार प्रतिसाद दिला जाईल.
अमेरिकेच्या हॉकआय स्ट्राइक ऑपरेशनचे मुख्य उद्दिष्ट सीरियातील आयसिसचा नाश करणे आणि अमेरिकन सैन्याचे संरक्षण सुनिश्चित करणे आहे. या कारवाईला अहमद अल-शाराच्या नेतृत्वाखालील नवीन सीरियन सरकारनेही पाठिंबा दर्शविला आहे, ज्यामुळे दोन्ही पक्षांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आयसिसच्या गडांवर कारवाईला अधिक प्रभावी आकार मिळण्याची शक्यता आहे.