मालिका जिंकली, पण कर्णधार फेल; सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म चर्चेत

20 Dec 2025 09:43:44
नवी दिल्ली,
Poor form of Suryakumar Yadav दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका भारताने ३–१ अशी जिंकत दमदार कामगिरी केली असली, तरी या यशामागे एक गंभीर चिंतेचा मुद्दा लपलेला आहे. हार्दिक पंड्या, वरुण चक्रवर्ती आणि तिलक वर्मा यांनी सातत्यपूर्ण योगदान देत संघाला विजयापर्यंत नेले. विशेषतः वरुण चक्रवर्तीने प्रभावी गोलंदाजी करत मालिकावीराचा मान पटकावला. मात्र, या चमकदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म ठळकपणे समोर आला आहे. मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला, मात्र अवघ्या सात चेंडूंमध्ये पाच धावा काढून तो माघारी परतला. हा त्याच्या संपूर्ण मालिकेतील अपयशाचा शेवट ठरला. या मालिकेत त्याने चार सामने खेळून केवळ ३४ धावा केल्या, तर त्याची सर्वोच्च धावसंख्या फक्त १२ इतकी होती. या आकडेवारीवरून तो धावा करण्यास तर दूरच, क्रीजवर टिकून राहण्यातही अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट होते आणि त्यामुळे भारतीय संघासाठी कर्णधाराची फलंदाजी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
 
 

suryakumar yadav age 
सूर्यकुमार यादवचा संघर्ष केवळ या मालिकेपुरता मर्यादित नाही. संपूर्ण २०२५ वर्षभर त्याची बॅट शांतच राहिली आहे. संघ घरच्या मैदानावर खेळत असो किंवा परदेशात, त्याच्या कामगिरीत अपेक्षित धार दिसून आलेली नाही. या वर्षात त्याने टी-२० क्रिकेटमध्ये एकही अर्धशतक झळकावलेले नाही. २०२५ मध्ये त्याने एकूण २१ टी-२० सामने खेळून फक्त २१८ धावा केल्या आहेत, जे त्याच्या दर्जाच्या फलंदाजासाठी अत्यंत निराशाजनक मानले जात आहे. मात्र, स्वतः सूर्यकुमार यादव वेळोवेळी आपण चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचा दावा करत आला आहे. धावा निघत नसल्या तरी नेट्समध्ये आपण उत्तम फलंदाजी करत असल्याचे आणि सर्वोत्तम प्रयत्न करत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. तरीही मैदानावरील आकडेवारी मात्र त्याच्या विधानाशी जुळत नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यानंतर कर्णधार सूर्याने स्वतःच्या फॉर्मवर भाष्य करताना थोड्या विनोदी शैलीत म्हटले की, कदाचित संघालाच सूर्याला एक फलंदाज म्हणून शोधण्यात अपयश आले. तो कुठेतरी हरवला होता, असे म्हणत त्याने हसत परिस्थिती हलकी केली. मात्र, तो अधिक मजबूतपणे पुनरागमन करेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. संघ अडचणीत असताना नेहमीच एखादा खेळाडू पुढे येऊन संघाला सावरतो, हे पाहणे कर्णधार म्हणून समाधानकारक असल्याचेही त्याने नमूद केले. तरीही, आगामी काळात सूर्यकुमार यादवची बॅट पुन्हा तडाखेबंद सूर लावते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0