इराणमध्ये इस्रायली हेरगिरीच्या आरोपाखाली एकाला सार्वजनिक फाशी

20 Dec 2025 14:56:53
तेहरान,
Public execution of man in Iran इराणने शनिवारी इस्रायली गुप्तचर संस्था आणि लष्करासाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला सार्वजनिकरित्या फाशी दिली. सरकारी माध्यमांनी सांगितले की, मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेल्या व्यक्तीचे नाव अघिल केशवर्झ असून, त्याने इराणी लष्करी आणि सुरक्षा क्षेत्रांचे फोटो काढल्यासह इस्रायलसोबत गुप्त माहिती शेअर केली होती. उर्मिया शहरात लष्करी मुख्यालयाचे छायाचित्रण करताना जून महिन्यात त्याला अटक करण्यात आली होती. इराणच्या माहितीप्रमाणे, त्याने राजधानी तेहरानसह विविध शहरांमध्ये मोसादसाठी २०० हून अधिक हेरगिरी कारवाया केल्याचा आरोप होता. त्यावर खटला चालवण्यात आला आणि सर्वोच्च न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा कायम ठेवली. या वेळी केशवर्झ फक्त २७ वर्षांचा असून, तो वास्तुकलेचा अभ्यास करत होता.
 
 
iran hanging man
 
जूनमध्ये इस्रायलने सुरू केलेल्या १२ दिवसांच्या हवाई युद्धानंतर, इराणने हेरगिरीच्या आरोपाखाली ११ जणांना मृत्युदंड दिला होता. इस्रायल आणि इराणमधील या संघर्षात सुमारे १,१०० लोकांचा मृत्यू झाला, ज्यात इराणी लष्करी कमांडर आणि अणुशास्त्रज्ञांचा समावेश होता. प्रत्युत्तरादाखल इस्रायलमध्ये इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाला. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये कोम शहरात मोसादसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली एका अज्ञात व्यक्तीला इराणने फाशी दिली होती. इराणमध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली खटले चालवताना अनेकदा आरोपींना त्यांच्याविरुद्धचे पुरावे पाहण्याची संधी मिळत नाही.
Powered By Sangraha 9.0