काँग्रेस नेत्या व माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन

20 Dec 2025 18:03:13
मुंबई,
Shalinitai Patil राज्याच्या राजकारणातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेत्या, माजी मंत्री आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचे आज निधन झाले. मुंबईतील माहिम येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ९४ वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या आणि वृधापकाळाने त्यांचे निधन झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
 
 

Shalinitai Patil  
 
 
शालिनीताई पाटील या राज्याच्या राजकारणातील एक अभ्यासू, कणखर आणि स्पष्टवक्त्या नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षासह संपूर्ण राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
 
 
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या राजकीय जीवनात शालिनीताई यांनी खंबीरपणे साथ दिली. स्वतःही त्यांनी मंत्री आणि आमदार म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या. ए. आर. अंतुले यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी महसूलमंत्री म्हणून काम पाहिले. मराठा आरक्षणासह विविध सामाजिक प्रश्नांवर त्यांनी ठाम भूमिका घेतली होती. मात्र, त्या काळात त्यांना अपेक्षित राजकीय पाठबळ मिळाले नव्हते, असे अनेकदा नमूद केले जात असे.
 
 
साताऱ्याचे खासदार Shalinitai Patil  उदयनराजे भोसले यांनी शालिनीताईंना मातेसमान मान देत त्यांच्याशी जवळीक ठेवली होती. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शालिनीताईंचा उल्लेख “महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण” असा केला होता, ही बाब त्यांच्या धाडसी आणि निर्भीड नेतृत्वाची साक्ष देणारी आहे.शालिनीताई आणि वसंतदादा पाटील यांचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिले. दोघांचेही हे दुसरे लग्न होते. शालिनीताईंचे पहिले पती एक विद्वान न्यायाधीश होते. त्यांच्या अकाली निधनानंतर त्या तरुण वयात विधवा झाल्या. त्या काळात त्यांनी बॅरिस्टरची पदवी मिळवली आणि मुंबई मंत्रालयात नोकरी स्वीकारली. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्या त्यांच्या वैयक्तिक सहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. पुढे वसंतदादांच्या पहिल्या पत्नीच्या आजारपणामुळे दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत मर्यादित उपस्थितीत हा विवाह पार पडला. या निर्णयावर टीकाही झाली, मात्र त्याकडे दुर्लक्ष करत दोघांनी सार्वजनिक जीवनात कार्य सुरूच ठेवले.
 
 
शालिनीताई पाटील यांच्या निधनाने एक अभ्यासू, अनुभवी आणि निर्भीड नेत्या काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. त्यांच्या कार्याची आणि योगदानाची दखल महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कायम घेतली जाईल.
Powered By Sangraha 9.0