भटक्या श्वानांना कोण आवरणार..?

20 Dec 2025 18:47:47

रवींद्र तुरकर
गोंदिया,
stray dogs गोंदिया जिल्ह्यातसह संपूर्ण देशात भटक्या स्वानांची दहशत प्रचंड वाढली आहे. दर दिवशी कुठे ना कुठे स्वानांच्या हल्ल्यात कुणी ना कुणी जखमी होतात. शहरांमध्ये अशा घटना अत्यंत गंभीर रूप धारण करताना दिसताहेत. गोंदिया जिल्ह्यात गत पाच वर्षात तब्बल 10 हजार 4 जणांवर स्वानांनी हल्ले करून जखमी केले आहे. यात एकाला प्राणही गमवावे लागले आहे. यंदाच्या वर्षा 19 डिसेंबरपर्यंत सर्वाधिक 2 हजार 873 जणांचे भटक्या स्वानांनी लचके तोडले आहे. देशातील वाढत्या घटनांवर सवोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करी स्वतःहून या विषयात लक्ष घातले. शाळा, रुग्णालये, बसस्थानक, क्रीडा संकुल येथील भटके स्वान पकडून त्यांची व्यवस्था निवारागृहात करावी, त्यांचे निर्बीजीकरण करावे, असे आदेश सरकारला दिले आहेत.
 

stray dogs, dog attacks, dog bite cases, Gondi, 
पदपथावरील खाद्यपदार्थ विक्रेते, मांस विक्रेते व हॉटेल व्यावसायिक तसेच, रहिवासी कचराकुंडी, गटार किंवा उघड्यावर शिल्लक व शिळे अन्न, मांस फेकून देतात. त्यामुळे भटक्या स्वानांची संख्या वाढत असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणने आहे. रात्रीच्या वेळी वाहने व पादचार्‍यांवर स्वान धावून जातात. स्वान अचानक अंगावर आल्याने त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी वाहनचालक वाहन वेगात चालवितात. त्यात अपघात होतात. रात्री अंधारात रस्त्यांवरून जाताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. स्वानाच्या चाव्यामुळे तसेच, अपघात होऊन जखमी होण्याच्या घटना जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहेत. लहान मुलांवर हल्ला करून चावे घेण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. 2021 ते 19 डिसेंबर 2025 या कालावधीत भटक्या स्वानांनी 10 हजार 4 जणांवर हल्ले करून त्यांना जखमी केले आहे. 2024 मध्ये गोरेगाव तालुक्यात एकाला प्राण गमवावे लागले आहे. धोकादायक असलेल्या भटक्या स्वानांना स्थानिक यंत्रणेने पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरण शस्त्रक्रीया करणे अपेक्षित होते. मात्र हा प्रकार कागदावरच राहिला आहे. त्यामुळं भटक्या स्वानांचा त्रास काही केल्या कमी होत नाही. भटक्या स्वानांच्या वाढत्या संख्येवर वैद्यकीय मार्गाने नियंत्रण आणि शंभर टक्के लसीकरण, हाच त्यावर प्रभावी उपाय ठरेल. या प्रश्नातही लक्ष घालण्याची वेळ सर्वोच्च न्यायालयावर येऊ नये!
 
 
स्वानाच्या निर्बीजीकरणासाठी निधी नसल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने तोंडावर बोट ठेवले आहे. भटक्या स्वानांची समस्या काही एका वर्षात उद्भवलेली नाही. सरकारी यंत्रणांचे त्याकडे झालेले दुर्लक्ष याला कारणीभूत आहे. वाढते नागरिकीकरण आणि लोकसंख्येसोबत येणार्‍या समस्यांसोबत येणारा प्रश्न भटक्या स्वनांपासून होणार्‍या उपद्रवाचा आहे आणि त्याकडे आजवर शासन व प्रशासनाने गांभीर्याने पाहिले नाही, हे वास्तव आहे. भटक्या स्वानांना पकडणे आणि त्यांचे निर्बीजीकरण करणे ही वेळखाऊ आणि किचकट प्रक्रिया असली, तरी ती थेट नागरिकांच्या जीविताशी निगडित आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा प्रश्न सोडवणे ही पालिका, नगरपालिका, पंचायतींची आणि प्रशासनाची जबाबदारी आहे.
 
मुले, वृद्धांवर मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. बाहेर जाताना खबरदारी घ्यावी, कुत्र्यांचे चावा घेतल्यास सर्वप्रथम जखम स्वच्छ पाणी व साबनाने धुवावी, जवळील शासकीय रुग्णालयात जावून डाग बाईट लस घ्यावी, ही लस सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध आहे.
- डॉ. अभिजीत गोल्हार
जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया.
 
भटक्या स्वानांनी सन 2021 ते 19 डिसेंबर 2025 पर्यंत चावा घेतल्याची आकडेवारी
 
तालुका केसेस
आमगाव 1864
अर्जुनी मोर 882
देवरी 371
गोंदिया 3567
गोरेगाव 622
सडक अर्जुनी 963
सालेकसा 628
तिरोडा 1107
एकूण 10004
Powered By Sangraha 9.0