ढाका,
The newspaper is not being published बांगलादेशची राजधानी ढाका सध्या तीव्र अस्थिरतेच्या विळख्यात सापडली असून, तरुण विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या हिंसाचाराने गंभीर वळण घेतले आहे. हादी यांच्या मृत्यूनंतर संतप्त जमावाने देशातील आघाडीची माध्यमसंस्था असलेल्या ‘प्रथम आलो’ आणि ‘द डेली स्टार’ यांच्या कार्यालयांवर हल्ला चढवून त्यांना आग लावली. या घटनेमुळे बांगलादेशातील माध्यमस्वातंत्र्याच्या इतिहासात अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. १२ डिसेंबर रोजी ढाक्यात हादी यांच्यावर गोळीबार झाला होता. काही दिवस सिंगापूरमध्ये उपचार सुरू असताना अखेर त्यांचे निधन झाले. या घटनेची बातमी पसरताच राजधानीसह अनेक भागांत संतापाचे वातावरण निर्माण झाले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास शेकडो निदर्शक घोषणाबाजी करत मीडिया कार्यालयांकडे चालून गेले आणि पाहता पाहता हिंसाचाराला सुरुवात झाली. ‘प्रथम आलो’चे कार्यकारी संपादक सज्जाद शरीफ यांनी या घटनेला बांगलादेशी पत्रकारितेच्या इतिहासातील अत्यंत काळा दिवस असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, पत्रकार रात्रीच्या वेळी दुसऱ्या दिवसाच्या वृत्तपत्रासाठी आणि ऑनलाइन आवृत्तीसाठी काम करत असतानाच समाजविरोधी घटकांनी हल्ला केला. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली, कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली आणि अनेकांना जीव वाचवण्यासाठी कार्यालयातून पळ काढावा लागला.

या हल्ल्याचा थेट परिणाम म्हणजे ‘प्रथम आलो’चे मुद्रित आवृत्ती प्रकाशित होऊ शकली नाही आणि वृत्तपत्राची वेबसाइटही तात्पुरती बंद राहिली. १९९८ मध्ये स्थापनेनंतर तब्बल २७ वर्षांत पहिल्यांदाच असे घडल्याची माहिती संपादकांनी दिली. त्यांनी हा प्रकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माध्यमांच्या स्वायत्ततेवर झालेला गंभीर हल्ला असल्याचे स्पष्ट शब्दांत नमूद केले. दरम्यान, हादी यांच्या मृत्यूने देशभर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ३२ वर्षीय हादी हे गेल्या वर्षीच्या जुलै चळवळीतील महत्त्वाचे नेतृत्व मानले जात होते. ‘इन्कलाब मंच’ या व्यासपीठाचे ते निमंत्रक आणि प्रवक्ता होते. ढाका विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या हादी यांनी पारंपरिक राजकारणावर सातत्याने टीका केली होती आणि स्वतःला नव्या पिढीचा निर्भीड आवाज म्हणून पुढे आणले होते. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात अद्याप हल्लेखोरांची ओळख आणि हत्येमागील हेतू स्पष्ट झालेला नाही. अंतरिम मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी हादी यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी केल्यानंतर ढाक्यासह इतर शहरांमध्ये निदर्शनांना अधिक तीव्र स्वरूप आले. राष्ट्रीय निवडणुकांची तयारी सुरू असताना आणि भारतासोबतचे संबंध पुन्हा सावरत असताना, या घटनेमुळे बांगलादेशात नव्या अस्थिरतेची ठिणगी पडली आहे. ठिकठिकाणी जाळपोळ, तोडफोड आणि माध्यमसंस्थांवर हल्ले होत असल्याने देशातील लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या भवितव्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.